१४ टन विषारी वायू हवेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 19:26 IST2016-07-19T19:26:18+5:302016-07-19T19:26:18+5:30

आंध्रप्रदेशातून बडोद्याकडे अ‍ॅसीड घेऊन जाणाऱ्या टँकरमधील गॅसकीट लिकेज झाल्याने तब्बल १४ टन विषारी वायू हवेत मिसळला. यामुळे आठ कि.मी. पर्यंत सगळीकडे धूरच धूर दिसत होता.

14 tons of poisonous air in the air! | १४ टन विषारी वायू हवेत !

१४ टन विषारी वायू हवेत !

- सोमनाथ खताळ/फकिरा देशमुख/शाम पुंगळे

राजूर (जि.जालना) - आंध्रप्रदेशातून बडोद्याकडे अ‍ॅसीड घेऊन जाणाऱ्या टँकरमधील गॅसकीट लिकेज झाल्याने तब्बल १४ टन विषारी वायू हवेत मिसळला. यामुळे आठ कि.मी. पर्यंत सगळीकडे धूरच धूर दिसत होता. परिसरातील हजारो नागरिकांनी भयभीत होऊन सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सोमवारी रात्री आठ वाजता भोकरदन तालुक्यातील भोकरदन-जालना राज्य रस्त्यावर राजूरजवळ ही घटना घडली. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली असून २१ तासांनंतरही गळतीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले नव्हते.
आंध्रप्रदेश राज्यातून ‘क्लोरोसल्फोनिक’ नावाचा १४ टन विषारी वायू घेऊन हा टँकर ट्रक (जीजे ०६, एव्ही ३४८३) बडोद्याकडे जात होता. टँकरच्या बॉटम व्हॉल्वमधील गॅसकीट अचानक लिकेज झाली आणि वायूगळतीला सुरूवात झाली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने टँकर उभा करून पळ काढला. त्यानंतर ही बाब परिसरातील काही लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रशासनाला कळविले. स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु रात्रीची वेळ असल्याने पुढे जाण्यास कोणीच धजावत नव्हते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वायू गळतीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने टँकर जागेवरच खाली केव्हा होतो, याची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, तहसीलदार रूपा चित्रक, सपोनि एस.एम.मेहेत्रे, तलाठी अविनाश देवकर, बारोटे हे तळ ठोकून होते. सरपंच शिवाजी पुंगळे आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी प्रशासनाला लागणारी मदत केली. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनीही पाहणी केली. यावेळी परिसरातील लोकांना सुरक्षेबाबत सुचना देण्याचे आदेश त्यांनी दिले, तसेच तज्ज्ञांना पाचारण करण्यास सांगितले. गळतीचा धुर आठ कि.मी. पर्यंत पसरला. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. या परिसरातील पिंपळगाव थोटे, अंबेगाव, खामखेडा, थिगळखेडा, पळसखेडा पिंपळे या मोठ्या गावांसह वाड्या- वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षित स्थळी जाणे पसंत केले. तसेच डोळ्यात जळजळ होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

अन् धूर अधिकच वाढला
टँकरला आग लागली आहे, हा गैरसमज झाल्याने धावतपळत आलेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी टँकरवर पाणी मारले. परंतु हे वायू ‘वॉटर रिअ‍ॅक्ट’ होणारे असल्याने धुर अधिकच वाढला. औरंगाबाद, जालना, भोकरन येथील अग्निमन विभागाचे बंब दाखल झाले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सुदैवाने पाऊस नसल्याने दुर्घटना टळल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पिकांचे नुकसान
या अ‍ॅसीडमध्ये क्लोरक सल्फर नावाचे केमीकल होते. त्यामुळे यापासून मानवी जिवीतास धोका नाही, असे औरंगाबादचे औद्यागिक व आरोग्य सुरक्षा उपसंचालक प्रमोद सुरसे यांनी सांगितेले. परंतु या अ‍ॅसीडमुळे दोन कि.मी.पर्यंतची पिके पुर्णता: करपून गेली होती. झाडांचीही पाने पिवळी पडून झडल्याचे दिसून आले.

विद्यार्थी पाठविले परत
राजूर परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी राजूर येथे येतात. परंतु या गळतीमुळे परिसरात सर्वत्र धुर पसरला होता. त्यामुळे परिसरातील पाचशे फुटापर्यंत येण्यास मज्जाव करण्यात आला होता. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलींनाही पोलिसांनी समजूत काढून परत पाठविले.

तज्ज्ञ आले अन् गेले
अ‍ॅसीड नियंत्रणासाठी प्रशासनाने औरंगाबाद येथील तीन खासगी कंपनीतील तज्ज्ञांना बोलविले. पाच तास प्रयत्न करूनही त्यांना यावर नियंत्रण आणण्यात यश आले नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे समजताच आपल्या सहकाऱ्यांसोबत फोटो काढून ते औरंगाबादच्या दिशेने परतले.

अवैध वाळू आली कामाला
अ‍ॅसीड गळती रोखण्यासाठी पाणी मारणे योग्य नव्हते. म्हणून तज्ज्ञांनी वाळू आणण्यास सांगितले. परंतु ऐनवेळी वाळू आणणार कोठुन असा प्रश्न प्रशासनासमोर होता. एवढ्यात तहसीलदार रूपा चित्रक यांनी सोमवारी अवैध वाळू वाहतूक करणारा पकडलेला ट्रक (एमएच२० एटी ६६७४) बोलविला. यातील सर्व वाळू याठिकाणी टाकण्यात आली, परंतु तरीही धुर आटोक्यात आला नाही.

वाहतूक वळवली
भोकरदन, टेंभूर्णीचे पोलीस आणि जालन्याहून १२ राज्य राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. भोकरदन-जालना या मार्गावरील वाहतूक जाफराबादमार्गे वळविण्यात आली होती.

Web Title: 14 tons of poisonous air in the air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.