१४ कोटींच्या रुईगाठी भस्मसात
By Admin | Updated: August 12, 2014 01:04 IST2014-08-12T01:04:43+5:302014-08-12T01:04:43+5:30
स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत १४ कोटी रुपये किंमतीच्या सात हजार रुईगाठी भस्मसात झाल्या. आग इतकी भीषण होती की तब्बल १० तासांनी आटोक्यात आली.

१४ कोटींच्या रुईगाठी भस्मसात
वखार महामंडळाच्या गोदामाला आग : सीसीआय, व्यापाऱ्यांचा माल
यवतमाळ : स्थानिक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत १४ कोटी रुपये किंमतीच्या सात हजार रुईगाठी भस्मसात झाल्या. आग इतकी भीषण होती की तब्बल १० तासांनी आटोक्यात आली. ही आग नेमकी कशाने लागली हे मात्र कळू शकले नाही.
दारव्हा मार्गावरील वखार महामंडळाच्या या गोदामात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा माल ठेवलेला आहे. कोट्यवधीच्या रुईगाठीही गोदामात आहेत. रविवारी १० आॅगस्टच्या रात्री १ ते १.३० च्या सुमारास गोदाम क्र.१ मध्ये अचानक आग लागली. हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. त्याने त्वरित यंत्रणेला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र आग आवाक्याबाहेर असल्याचे तहसीलदार अनुप खांडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ इतर तालुक्यातील अग्निशमन दलाची मदत मागविली. पहाटेच्या सुमारास नेर, आर्णी आणि पुसद येथील वाहनेही घटनास्थळी दाखल झाली.
आगीमुळे गोदामाचे लोखंडी छत वितळून खाली कोसळले. परिणामी आग पुन्हा वाढली. शेजारी असलेल्या गोदामालाही आग लागण्याचा धोका होता.
त्यामुळे युनिट क्र.२ मध्येही पाण्याचा मारा करण्यात आला. दरम्यान, आग नियंत्रित करण्यासाठी जेसीबी मशीनने गोदामाचे शटर तोडण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या गोदामात सीसीआय आणि खासगी व्यापाऱ्यांच्या ७ हजार ७८८ रुईगाठी ठेवलेल्या होत्या. एका गाठीची किंमत १८ हजार रुपये असून तब्बल १४ कोटी १९ लाख रुपयांच्या गाठी भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (शहर वार्ताहर)