वसई शहरातील १३५ अनधिकृत बांधकामे उध्वस्त
By Admin | Updated: October 19, 2016 03:45 IST2016-10-19T03:45:56+5:302016-10-19T03:45:56+5:30
पावसाळ्यामुळे गेली दोन महिने थंडावलेली अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई वसई विरार महापालिकेने पुन्हा सुरु केली

वसई शहरातील १३५ अनधिकृत बांधकामे उध्वस्त
वसई : पावसाळ्यामुळे गेली दोन महिने थंडावलेली अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई वसई विरार महापालिकेने पुन्हा सुरु केली आहे. पालिकेच्या पथकाने संतोष भुवन, वालईपाडा, गावराईपाडा परिसरातील तब्बल १३५ बेकायदा बांधकामे जमिनदोस्त केली. याहीवेळी स्थानिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी जमावाला पिटाळून लावून कारवाईचा मार्ग मोकळा केला.
पावसाळ्याचे साडेतीन ते चार महिने मनपाची अवैध बांधकामांवरील कारवाई बंद थंडावली होती. त्याचा फायदा उचलत चाळमाफियांनी या कालावधीत अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणात उभारली आहेत. परंतु आता महापालिकेने अवैध बांधकामांविरोधी कारवाई सुुरु केली आहे. महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी नुकतीच सर्व प्रभाग सहाय्यक आयुक्त व अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच कारवाई पथकावर होत असलेले हल्ले लक्षात घेऊन संबंधीत पोलीस ठाण्यांशी बंदोबस्तासाठी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
आयुक्तांच्या आदेशानंतर उपायुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग फ चे सहाय्यक आयुक्त राजेंद्र पाटील, अतिक्रमण अधिकारी, मनपा सुरक्षा बल यांनी पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात संतोषभुवन, वलाईपाडा, गावराईपाडा आणि आजूबाजुच्या भागातील अवैध बांधकामे जमिनदोस्त केली. या कारवाईत पालिकेने १३५ अवैध गाळ्यांवर कारवाई करुन जमिनदोस्त केले.
दरम्यान, संतोषभुवन येथे पालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. परंतू पोलीसांनी ग्रामस्थांचा प्रयत्न हाणून पाडताना पालिका पथकाला कारवाईचा मार्ग मोकळा करुन दिला. पालिकेने पुन्हा अवैध बांधकामांकडे मोर्चा वळवला असल्याने भुमाफिया व बांधकाम माफियांमध्ये घबराट पसरली आहे.