टीईटीच्या परीक्षेला १३२५ परीक्षार्थींची दांडी
By Admin | Updated: December 16, 2014 03:34 IST2014-12-16T03:34:10+5:302014-12-16T03:34:10+5:30
भविष्यात प्राथमिक शिक्षकांची भरती करण्याच्या दृष्टीने प्रथमत: त्यांची यादी तयार करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी पार पडली

टीईटीच्या परीक्षेला १३२५ परीक्षार्थींची दांडी
ठाणे : भविष्यात प्राथमिक शिक्षकांची भरती करण्याच्या दृष्टीने प्रथमत: त्यांची यादी तयार करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी पार पडली. या परीक्षेसाठी ठाणे येथील ४२ परीक्षा केंद्रांवर १७ हजार ७३२ या भावी शिक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे एक हजार ३२५ शिक्षक या परीक्षेला गैरहजर राहिल्याचे उघड झाले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा केंद्रातर्फे ठाणे शहरातील ४२ परीक्षा केंद्रांवर टीईटीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ठाणे जिल्ह्णासह अन्यही जिल्ह्णांतील सुमारे १७ हजार ७३२ परीक्षार्थ्यांपैकी १६ हजार ४०७ शिक्षकांची म्हणजे ९३ टक्के उपस्थिती होती. उर्वरित सुमारे १३२५ शिक्षक या परीक्षेला गैरहजर असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गुरुनाथ कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सकाळ व दुपार या दोन सत्रांत ही परीक्षा घेतली असता सकाळच्या ११ हजार २०१ परीक्षार्थ्यांपैकी १० हजार ४५२ जणांची उपस्थिती होती, तर ७४९ गैरहजर होते, तर दुपारच्या सत्रातील सहा हजार ५३१ पैकी पाच हजार ९५५ जणच उपस्थिती होती. उर्वरित ५७६ भावी शिक्षक गैरहजर राहिल्याचे उघड झाले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा भविष्यात भरती होणाऱ्या शिक्षकांच्या यादीत समावेश केला जाणार आहे. (प्रतिनिधी)