आईने लावले १३ वर्षीय मुलीचे लग्न
By Admin | Updated: May 7, 2017 04:49 IST2017-05-07T04:49:12+5:302017-05-07T04:49:12+5:30
गरिबीला कंटाळून आईने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचा विवाह ४० वर्षांच्या टॅक्सी चालकासोबत करुन दिला. त्यानंतर त्यानेही तिला

आईने लावले १३ वर्षीय मुलीचे लग्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गरिबीला कंटाळून आईने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचा विवाह ४० वर्षांच्या टॅक्सी चालकासोबत करुन दिला. त्यानंतर त्यानेही तिला काही समजण्याच्या आतच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु केले. त्याच्या तावडीतून तिने पळ काढत आईकडे धाव घेतली. मात्र आईनेही तिला मारहाण करत पुन्हा त्याच्याकडेच पाठविण्याचा प्रयत्न केल्याने तिने तेथून पळ काढला आणि थेट पोलिसांना याबाबत कळविले. त्यांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आल्याची घटना माहीममध्ये शनिवारी उघडकीस आली.
माहीमच्या नयानगर परिसरात १३ वर्षांची नेहा आई व दोन बहिणींसह राहते. वडिलांच्या निधनानंतर तिने शाळा सोडली आणि आईला घरकामात मदत करु लागली. मात्र आर्थिक चणचणीमुळे आईला मुलींचा भार वाटू लागला. याच दरम्यान एका ४० वर्षांच्या वांद्रे येथील टॅक्सी चालकाचे स्थळ तिच्यासाठी आले. आईने नेहाच्या इच्छेविरुद्ध आसीफ आयुब खानसोबत २० मार्च रोजी तिचा विवाह लावला. विवाहानंतर आसीफने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्याच्या अत्याचाराला कंटाळून नेहाने २९ एप्रिल रोजी घरातून पळ काढत, आईकडे धाव घेतली. मात्र आईने तिला मारहाण करुन त्याच्याकडे पाठविले. त्यानंतर ५ मे रोजी आसीफसोबत ती आईकडे आली. तेथे तिने आसीफसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्याच रागात आईने मारहाण केल्याने तिने शेजारील रहिवाशांच्या घरात बंद करुन घेतले. तेथील महिलेच्या मोबाइलवरून पोलीस नियंत्रण कक्षास या घटनेची माहिती देत आपली सुटका केली.
आरोपींना ८ मेपर्यंत कोठडी
पोलिसांनी ३५ वर्षांच्या आईसह पती आसीफ आयुब खान (३८) आणि लग्न लावून देणारा अहमद राजम मोहम्मद शेख (३८) अशा तिघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.