१३ वर्षीय मुलाची आत्महत्या, पोलिसांचा मोबाईल गेमवर संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 18:11 IST2017-08-17T17:44:21+5:302017-08-17T18:11:11+5:30
विनायकनगर येथे राहणा-या दानिश अफजल शेख (१३) या शाळकरी मुलाने बुधवारी (दि.१६ ) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी दानिश घरात एकटाच असल्याने पोलिसांनी तो वापरत असलेला मोबाईल आज तपासासाठी ताब्यात घेतला आहे.

१३ वर्षीय मुलाची आत्महत्या, पोलिसांचा मोबाईल गेमवर संशय
ऑनलाईन लोकमत
आष्टी (बीड ), दि. १७ : विनायकनगर येथे राहणा-या दानिश अफजल शेख (१३) या शाळकरी मुलाने बुधवारी (दि.१६ ) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी दानिश घरात एकटाच असल्याने पोलिसांनी तो वापरत असलेला मोबाईल आज तपासासाठी ताब्यात घेतला आहे. मोबाईलवरील गेमच्या आहारी जाऊन ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त करत शहर पोलिसांनी मोबाईल पुढील तपासासाठी सायबर क्राईम विभागाकडे सुपूर्द केला आहे.
अफजल शेख व मिनाज हे दोघेही शिक्षक आहेत. त्यांना दोन मुले आहेत , दानिश हा त्यांचा लहान मुलगा होत. बुधवारी दानिशच्या शाळेला सुटी असल्याने तो घरी एकटाच होता तर त्याचे आईवडील दोघेही त्यांच्या शाळेवर गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्याची आई मिनाज या घरी आल्यानंतर त्यांना दानिशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व शवविच्छेदनानंतर अकस्मात मृत्यूची नोंद बुधवारी रात्री केली.
आज पुढील तपास करताना पोलिसांनी दानिश घरात एकटा असताना त्याच्याजवळ असणारा मोबाईल संच ताब्यात घेतला. मोबाईल गेमच्या व्यसनामुळे हि घटना झाली असल्याचा संशय यावेळी पोलिसांनी व्यक्त करत मोबाईल सायबर क्राईम विभागाकडे तपासणीसाठी पाठवला आहे. मोबाईलला पर्सनल कोड असल्याने याच्या तपासणीनंतरच सर्व प्रश्नांची उकल होईल.
दानिशला व्हायचे होते डॉक्टर
अभ्यासात चुणचुणीत असणारा दानिश हा शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा, चाचण्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असायचा. मी मोठ्या भावासारखे इंजिनियरींग करणार नसून मला डॉक्टर व्हायचे आहे, असे तो नेहमी सांगत असल्याचे त्याचे वडील अफजल शेख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
मोबाईल तपासणीनंतरच सत्य कळेल
दानिश घरात एकटा असताना त्याच्याजवळचा मोबाईल आम्ही ताब्यात घेतला आहे. परंतु, तो पासवर्ड प्रोटेक्टेड असल्याने त्यास सायबर क्राईम विभागाकडे सोपविण्यात आला आहे. मोबाईल उघडल्यानंतर सत्य बाहेर येईल.
- प्रकाशकुमार पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, आष्टी