१३ डॉक्टरांचे राजीनामे
By Admin | Updated: May 29, 2015 01:20 IST2015-05-29T01:20:35+5:302015-05-29T01:20:35+5:30
गेल्या महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांसह तेरा डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

१३ डॉक्टरांचे राजीनामे
पंढरपूर : रुग्णालयामध्ये आवश्यक साधनसामुग्री दिली जात नाही, डॉक्टरांची संख्या अतिशय कमी असून रिक्त पदे भरली जात नाहीत अशा अनेक कारणांसाठी गेल्या महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांसह तेरा डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी या तेरा डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. परंतु, या संपाचा फटका रुग्णांना बसू नये यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी डॉक्टरांची सोय केली होती.
उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयाकडे वारंवार मागणी केली. त्या मागण्या पूर्ण न झाल्याने डॉ. गायकवाड यांनी राजीनामा दिला होता. मात्र आश्वासनानंतर त्यांनी तो राजीनामा मागेही घेतला. परंतु, आश्वासने पूर्ण झाली नसल्याने अखेर डॉ. गायकवाड यांच्यासह तेरा डॉक्टरांनी २७ एप्रिल रोजी सामूहिक राजिनामा दिले होते. त्याचीही शासनदरबारी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी कामबंद आंदोलन केले.
डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने रुग्णांचे आणि डॉक्टरांचेही हाल होत आहेत. शिवाय काही असंतुष्ट लोकांच्या ‘अर्थपूर्ण’ हस्तक्षेपामुळे आम्हाला राजीनामे द्यावे लागले.
- डॉ. पंकज गायकवाड,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर