13 आरोपींना मोक्काअंतर्गत प्रत्येकी 12 वर्षे सश्रम कारावास
By Admin | Updated: December 22, 2016 20:56 IST2016-12-22T20:56:22+5:302016-12-22T20:56:22+5:30
१३ आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी मोक्का कायद्यांतर्गत प्रत्येकी बारा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे एकूण एक कोटी तीस लाख रुपये दंड ठोठावला.

13 आरोपींना मोक्काअंतर्गत प्रत्येकी 12 वर्षे सश्रम कारावास
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - अहमदनगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथील दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एकूण १३ आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी मोक्का कायद्यांतर्गत प्रत्येकी बारा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे एकूण एक कोटी तीस लाख रुपये दंड ठोठावला.
तत्कालीन पोलिस निरीक्षक केशव बाबुराव रणदिवे हे पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्या असे निदर्शनास आले की, कोठेवाडी येथील दरोडा व सामुहिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एकुण १३ आरोपींची संघटीत गुन्हेगारी करणारी टोळी आहे. या टोळीने अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पाथर्डी, गंगापूर, सिल्लेगाव या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात मागील दहा वर्षात दरोडा , बलात्कार आणि सामुहिक बलात्कारासारखे अनेक गंभीर गुन्हे वैयक्तिक आणि सांघीकरित्या केले आहेत. म्हणुन तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी एम.एम. बेलदार यांनी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेवून वरील आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत वेगळा गुन्हा नोंदवून तपासाअंती औरंगाबादच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीच्यावेळी तत्कालीन सरकारी अभियोक्ता राजेंद्र मुगदिया आणि विद्यमान सरकारी अभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी एकुण ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती विशेष न्यायालयाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील आरोपी दारासिंग उर्फ मारुती वकिल्या भोसले , रमेश उर्फ रेच्या धुपाजी काळे,बंडु उर्फ बबन उत्तम भोसले, हबीब उर्फ हब्या पानमळ्या भोसले, गारमण्या खुबजत चव्हाण, राजू उर्फ अंदाज वकिल्या भोसले, उमऱ्या धनशा भोसले, रसाळ्या डिंग्या भोसले, संतोष उर्फ हरी डिस्चार्ज काळे, सुरेश उर्फ तरशा चिंतामण काळे, हणमंता नकाशा भोसले, चिकु उर्फ चिक्या सरमाळ्या भोसले आणि सुभाष काशीनाथ देसाई भोसले या १३ आरोपींना मोक्का कायद्याच्या कलम ३ (१)(२) खाली प्रत्येकी १२ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३(४) खाली सुद्धा प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावला. न्यायालयाने या गुन्ह्यातील सर्व आरोपींना २० डिसेंबर रोजी दोषी जाहीर करताच जामीनावर सुटलेला यातील १४ वा आरोपी करंड्या उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे न्यायालयातून फरार झाला. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे.
वरील आरोपींसह इतर आरोपींनी १७ जानेवारी २००१ रोजी कोठेवाडी येथील सर्व घरांना बाहेरुन कड्या लावून सोने व चांदीचे दागीने व रोख असा एकुण ४४ हजार ३५ रुपयांचा ऐवज लुटला होता. तसेच चार महिलांवर सामूहिक अत्याचार केला होता.