१२६ कोटी केव्हा मिळणार?
By Admin | Updated: February 10, 2015 00:48 IST2015-02-10T00:48:39+5:302015-02-10T00:48:39+5:30
वर्षभरापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेल्या जिल्ह्यातील ८०३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सरकारकडे १५८ कोटींची मागणी केली होती. परंतु ३२ कोटी मिळाले.

१२६ कोटी केव्हा मिळणार?
रस्त्यांची दुरुस्ती रखडली : बांधकाम समिती सदस्यांचा प्रश्न
नागपूर : वर्षभरापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेल्या जिल्ह्यातील ८०३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सरकारकडे १५८ कोटींची मागणी केली होती. परंतु ३२ कोटी मिळाले. यातून जेमतेम ४५ रस्त्यांची कामे झालेली आहेत. उर्वरित १२६ कोटी केव्हा मिळणार असा प्रश्न सोमवारी बांधकाम समितीच्या बैठकीत माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यासह सदस्यांनी उपस्थित केला.
२०१३-१४ या वर्षात रस्ते दुरुस्तीसाठी ३२ कोटींचा निधी मिळाला. यातून ४५ कामे पूर्ण करण्यात आली. १५२ कामे सुरू आहेत परंतु उर्वरित ६०५ कामे रखडलेली आहेत. पुढील पावसाळ्यापर्यंत ती दुरुस्त होण्याची शक्यता नाही. रस्ते नादुरुस्त असल्याने ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकांना त्रास होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. १० कोटी ४० लाखांच्या निविदा स्वीकृत करण्यात आल्या आहेत. या कामाचे कार्यादेश देण्यात आले. यात रस्ते बांधकाम व दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास, अंगणवाडी बांधकाम व आरोग्य विभागाच्या कामांचा समावेश असल्याची माहिती उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिली. जि.प.मार्फत करण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा काढण्याला विलंब लागतो. यासाठी अल्पमुदतीच्या निविदा काढण्याची शासनाने अनुमती द्यावी, असा प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली. सदस्य दुर्गावती सरियाम, कमलाकर मेंघर, अंबादास उके, नंदा नारनवरे, शांताराम मडावी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
आराखड्यात कामांचा समावेश करा
रस्ते विकास आराखडा २००१-२१ मध्ये जि.प.सर्कलमधील अनेक रस्त्यांचा समावेश नाही. ते समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
४० कोटींची मागणी
रस्ते दुरुस्तीसाठी बांधकाम समितीने ग्राम विकास विभागाकडे ४० कोटीची मागणी केली आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर यातून रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहे.