१२२ आॅटोरिक्षांवर कारवाई
By Admin | Updated: September 2, 2014 01:14 IST2014-09-02T01:14:04+5:302014-09-02T01:14:04+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने १ सप्टेंबरपासून आॅटोरिक्षा मीटरने चालण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार आज सकाळपासून चार पथकाच्या मदतीने आॅटोंची तपासणी करण्यात आली.

१२२ आॅटोरिक्षांवर कारवाई
आरटीओची धडक मोहीम : ७७ आॅटोंना नोटीस तर ४५ जप्त
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने १ सप्टेंबरपासून आॅटोरिक्षा मीटरने चालण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार आज सकाळपासून चार पथकाच्या मदतीने आॅटोंची तपासणी करण्यात आली. यात १२२ आॅटोरिक्षा विना मीटर धावत असल्याचे आढळून आले. यातील ७७ आॅटोंना नोटीस बजावण्यात आली असून ४५ आॅटोंवर जप्तीची कारवाई करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या मोहिमेमुळे आॅटोचालकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. अनेकांनी आॅटोरिक्षा रस्त्यावरच आणल्या नाहीत. परिणामी अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
आॅटोरिक्षा प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा आणि आॅटो मीटरने चालविण्याच्यासाठी तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत नुकताच घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण यांनी सांगितले, आज सकाळी ९ वाजतापासून तपासणी मोहिमेला सुरुवात झाली. साधारण दीड हजाराच्यावर आॅटोरिक्षांची तपासणी करण्यात आली. यात आॅटोरिक्षा परवानाधारकाने मीटर प्रमाणे न चालणे, सदोष मीटरचा वापर करणे, मीटर नसताना वाहन वापरणे, मीटर सील तुटलेले असताना वाहनाचा वापर करणे, खोटे दरपत्रक वाहनात ठेवणे आदी बाबी तपासण्यात आल्यात. यात १२२ आॅटोरिक्षे दोषी आढळून आले. यातील ७७ आॅटोंना नोटीस बजावण्यात आली तर ज्या आॅटोंमध्ये गंभीर स्वरुपातील त्रुटी होत्या त्यांना जप्त करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
अन् आॅटो मीटरने धावले
कारवाईच्या धास्तीने का होईना शहरात आज बऱ्याच वर्षानंतर आॅटो मीटरने धावत असल्याचे चित्र दिसून आले. अनेक प्रवासी सीटनुसार चलण्याचा आग्रह करीत असताना आॅटोचालक मीटरनेच चालणार, या भूमिकेवर ठाम होते. आॅटो भाडेदरातील वाढ आणि मीटरच्या सक्तीमुळे काही प्रवाशांमध्ये नाराजी तर काहींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
९० हजार रुपयांचा दंड
सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेत दोषी आढळून आलेल्या आॅटोचालकांना ९० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. विशेष म्हणजे, सुधारित दंडसूची अनुसार विभागीय कारवाईअंतर्गत दंड आकारण्यात आला. यात एक हजार तडजोड शुल्क आणि दोन हजार रुपये विभागीय कारवाई असा एकूण तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गशर्दनात, विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोळकर, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत कंकरेज, नरेंद्र कठाणे, उज्ज्वल भावसार, मोनिका राठोड व आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली.