12 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2016 20:14 IST2016-08-16T20:14:16+5:302016-08-16T20:14:16+5:30
मुलाला काही कळायच्या आतच गावातून मुलाला घेऊन पसार होत बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केला

12 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 16 - बुलढाण्यात अज्ञात इसमाने नातेवाईकाचे घर दाखविण्याचा बहाणा करून १२ वर्षीय मुलास मोटारसायकलीवर बसविले व मुलाला काही कळायच्या आतच गावातून मुलाला घेऊन पसार होत बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र मुलाच्या सतर्कतेने हा अपहरणाचा प्रयत्न फसला. ही घटना रविवारी तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे घडली.
खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील सुमेध साहेबराव सदांशिव (वय १२) हा रविवारी घरासमोर खेळत असताना मोटारसायकलने आलेल्या अज्ञात इसमाने सुमेधला नातेवाईकांचे घर दाखव, अशी बतावणी करीत सुमेधला मोटारसायकलीवर बसवून गावातून पळ काढला. यानंतर सदर बालकास अकोला जिल्ह्यातील मळसुर शिवारात नेवून सुमेधला मारहाण केली. यामध्ये सुमेधचे डोके फुटले. दरम्यान याच रस्त्याने समोरून येणाऱ्या वाहनामुळे अज्ञात इसम मुलाच्या बाजुला झाला ही वेळ व प्रसंगावधान साधून मुलाने पळ काढला. त्यानंतर सुमेधला भेटलेल्या नागरीकांनी चौकशी केली असता सुमेधने आपली आपबिती कथन केली. मात्र तोपर्यंत अपहरणकर्ता पसार झाला. मळसुर येथील नागरीकांनी सुमेधवर औषधोपचार करून त्याचे कुटुंबीयांशी संपर्क करुन त्याला कुटुंबीयांचे ताब्यात दिले. या घटनेची उपरोक्त आशयाची फिर्याद सुमेधचे वडिलांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीनुसार पोलिस तपास करीत आहेत.