१२ लाखांचा बक्षिसी नक्षलवादी शरण
By Admin | Updated: November 12, 2014 00:58 IST2014-11-12T00:58:08+5:302014-11-12T00:58:08+5:30
उत्तर गडचिरोली भागात मागील १२ वर्षांपासून कार्यरत जहाल नक्षलवादी माजी दलम कमांडर गोपी ऊर्फ निरींगसाय दरबारी मडावी याने सोमवारी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

१२ लाखांचा बक्षिसी नक्षलवादी शरण
१२ वर्षांपासून कार्यरत : उत्तर गडचिरोली भागात माओवादी चळवळीला हादरा
गडचिरोली : उत्तर गडचिरोली भागात मागील १२ वर्षांपासून कार्यरत जहाल नक्षलवादी माजी दलम कमांडर गोपी ऊर्फ निरींगसाय दरबारी मडावी याने सोमवारी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली. गोपीच्या शरणागतीमुळे उत्तर गडचिरोली भागातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
नक्षलवाद्याच्या उत्तर गडचिरोली, बालाघाट, राजनांदगाव विभागाचा प्रवक्ता म्हणून गोपी याने काही काळ काम केले होते. मूळचा कोरची गावचा रहिवासी असलेल्या गोपीचे कोरची येथे बसस्थानकालगत घरही आहे. २००२ पासून तो नक्षल चळवळीत दाखल झाला होता. मागील १५ वर्षांच्या काळात त्याने या भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडविल्या होत्या. त्याच्यावर १२ लाखाचे बक्षीसही पोलिसांनी ठेवले होते. कोरची दलम के -३ चा तो माजी कमांडर होता. सोमवारी दुपारी कुरखेडा तालुक्यातील सावरगाव जवळ जंगलात एका मध्यस्थामार्फत त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यानंतर त्याला सायंकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. २०१३ मध्ये एकूण ४८ नक्षलवाद्यांनी आत्मसर्पण केले. त्यामध्ये ३ डीव्हीसी सदस्य, १ कमांडर, ३ उपकमांडर, ३९ दलम सदस्य यांचा समावेश आहे. तर २०१४ मध्ये आतापर्यंत २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यामध्ये एक डीव्हीसी सदस्य, २ कमांडर, ३ उपकमांडर आणि १२ दलम सदस्यांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)