पाच जिल्ह्यांतील ११७ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: February 27, 2015 00:16 IST2015-02-26T23:58:02+5:302015-02-27T00:16:54+5:30
वन्यप्राणी मृत्यू प्रकरण : वनविभागातर्फे खटले दाखल; न्यायालयात सुनावणी सुरू; आजअखेर सहाजण निर्दोष

पाच जिल्ह्यांतील ११७ जणांवर गुन्हा
भीमगोंडा देसाई -कोल्हापूर - वन्यप्राणी मृत्यूप्रकरणी २००९ ते जानेवारी २०१५ अखेर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील ११७ जणांवर विविध कलमांखाली वनविभागाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सर्व खटल्यांची सुनावणी कार्यक्षेत्रातील न्यायालयात सुरू आहे. आतापर्यंत सहाजण निर्दोष सुटले आहेत. खटल्यासंबंधी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित झाला होता. शिकार, तस्करी आणि शेत पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने केलेल्या उपाययोजनेमुळे वन्यप्राण्यांचे मृत्यू होतात. त्याप्रकरणी वनविभाग पोलिसांत वन्यप्राण्यांच्या मृत्यूस जबाबदार आढळलेल्यांवर गुन्हा दाखल करते. सन २००९ मध्ये सावंतवाडी तालुक्यातील रानडुक्कराच्या मृत्यूप्रकरणी दोन, तर वाघाचे कातडे मिळाल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. सांगली जिल्ह्यातील तीन कासव तस्करी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०१० मध्ये कासव तस्करप्रकरणी एक, तर चिपळूण तालुक्यातील तीन बिबट्यांच्या शिकारप्रकरणी आठजणांवर, तर रानकोंबडा हत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. बिबट्या शिकारप्रकरणातील तिघांची ९ आॅक्टोबर २०१२ला लांजा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. रानकोंबडा हत्याप्रकरणी शासनाच्या विरोधात निकाल लागला आहे. अपिलासाठी हालचाली सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात सन २०११ साली दोन ससा शिकारप्रकरणी तिघांवर, एका सांबराला मारल्या प्रकरणी चौघांवर तर एका माकडाच्या हत्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. सांगली जिल्ह्यात एक माकड शिकारप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. चिपळूण तालुक्यात एका बिबट्याच्या शिकारप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी फरार आहे. सन २०१२ मध्ये ससा, भेकर, मोर यांच्या शिकारप्रकरणी विविध ठिकाणच्या १४ जणांवर गुन्हा झाला आहे. न्यायालयात सुनावणी चालू आहे. सांगली जिल्ह्यातील मांडूळ साप, कासव तस्करप्रकणी नऊजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०१३ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भेकर, शेकरू, वाघ, सांबर, बिबट्या, गवा, गेळा, काळवीट, चिंकारा, मगर यांची शिकार झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. २०१४ मध्ये सावंतवाडी तालुक्यात गवा, सांबर शिकारप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सांगली जिल्ह्यात मांडूळ साप, कासव तस्करप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (क्रमश:)
तब्बल ३,३४६ जनावरे फस्त...
सहा वर्षांत ८४ वन्यप्राण्यांच्या मृत्यूप्रकरणी ११७ जणांवर ३३ गुन्हे दाखल केले आहेत. याउलट जंगलात आणि लगतच्या शेतात चरण्यासाठी गेलेल्या ३ हजार ३४६ पाळीव जनावरे वन्यप्राण्यांनी २००४ ते २०१४ अखेर फस्त केली. सर्वाधिक म्हणजे सन २०१३ मध्ये ५२० जनावरांचा बळी वन्यप्राण्यांनी घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यास वनविभागाने भरपाई दिली आहे. भरपाई किरकोळ असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
वन्यप्राणी
मानव संघर्ष
भाग
२