नेट बँकिंगद्वारे महिलेला ११ लाखांचा गंडा
By Admin | Updated: September 17, 2014 22:22 IST2014-09-17T22:20:01+5:302014-09-17T22:22:50+5:30
सांगलीतील प्रकार-याप्रकरणी पश्चिम बंगालमधील तिघांच्या टोळीवर गुन्हा दाखल

नेट बँकिंगद्वारे महिलेला ११ लाखांचा गंडा
सांगली : नेट बँकिंगद्वारे पासवर्ड मिळवून व मोबाईल हँग करून सुश्मिता सुबोध खाटक (रा. शुक्रवार पेठ, माधवनगर) या व्यापारी महिलेच्या बँक खात्यातून ११ लाख १५ हजाराची रोकड परस्पर दुसऱ्या खात्यावर वर्ग करून गंडा घातल्याचा प्रकार आज (बुधवारी) उघडकीस आला. याप्रकरणी पश्चिम बंगालमधील तिघांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्होडाफोन मोबाईल कंपनी व युनियन बँक आॅफ इंडियाच्या माधवनगर शाखेवरही बेजबाबदारपणाबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीचा हा प्रकार ११ सप्टेंबररोजी रात्री घडला. त्यानंतर सुश्मिता खाटक यांचा मोबाईल रात्री आठ ते दुसऱ्या दिवशी दुपारी दोनपर्यंत हँग करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यावरून झालेल्या व्यवहाराचा त्यांना कोणताही संदेश मोबाईलवर मिळू शकला नाही.
सुश्मिता खाटक यांचे माधवनगरमध्ये ‘श्री एंटरप्रायजेस’ नावाचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे दुकान आहे. त्यांचे माधवनगर येथील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्यावर ११ लाख १५ हजाराची रक्कम होती. ११ सप्टेंबररोजी रात्री आठ वाजता त्यांचा मोबाईल हँग झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमधील रोशन खान, राम नारायण, प्रथन दास (पूर्ण नावे समजली नाहीत) या तिघांनी तीन वेळा खाटक यांचा बँक पासवर्ड हॅक करून त्यांच्या खात्यावरील सर्व रक्कम स्वत:च्या खात्यावर वर्ग करून ती काढून घेतली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)