कोल्हापूर जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायती ‘बेघर’
By Admin | Updated: November 12, 2014 23:33 IST2014-11-12T23:14:59+5:302014-11-12T23:33:46+5:30
राजकीय उदासीनता कारणीभूत : नियोजनबध्द आराखडा नाही

कोल्हापूर जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायती ‘बेघर’
भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -स्वातंत्र्याच्या साठीनंतर जिल्ह्यातील १०६ ग्रामंपंचायती स्वत:च्या मालकीची इमारत नसल्यामुळे हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित आहेत. याशिवाय २०१३-१४ मध्ये ३१ गावांना ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर केला आहे. यातील बहुतांश इमारतीच्या कामाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी लाखांच्या घरात खर्च केला जातो; मात्र ग्रामपंचायतीला हक्काची इमारत असावी, यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण १०२९ ग्रामपंचायती आहेत. गावात मूलभूत सुविधा देणे ही मुख्य जबाबदारी ग्रामपंचायतीची आहेत. अलीकडे ग्रामपंचायतीला जादा अधिकार दिले जात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायतीतर्फे राबविल्या जातात. केंद्र व राज्याकडून थेट आॅनलाईनवर ग्रामपंचायतीच्या खात्यावर निधी जमा केला जात आहे. यामुळे राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला महत्त्व आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदशील आणि गावपातळीवरील लोकप्रतिनिधी सतर्क असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या इमारती पाच ते
दहा वर्षांपूर्वीच झालेल्या
आहेत. लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा, आमदार, खासदार, प्रसंगी
मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्याकडे
पाठ फिरविलेल्यांच्या गावात
अजूनही ग्रामपंचायतीला इमारत
नाही.
प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी उद्दिष्ट शासनाकडून येते. त्यानुसार लोकप्रतिनिधीकडून निवडलेल्या गावांना निधी दिला जातो. इमारत नसलेल्या गावांपैकी काही गावांना पुढील वर्षी निधी मिळेल.
- एम. एस. घुले (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत)