मुळा-मुठा नदी शुद्धीकरणासाठी जपानसोबत १ हजार कोटींचा करार
By Admin | Updated: January 13, 2016 16:50 IST2016-01-13T16:49:22+5:302016-01-13T16:50:26+5:30
पुण्यातील मुळा व मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीशी (जायका) तब्बल १००० कोटी रुपयांचा करार केला

मुळा-मुठा नदी शुद्धीकरणासाठी जपानसोबत १ हजार कोटींचा करार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - गंगा नदीच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पानंतर पुण्यातील मुळा व मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीशी (जायका) तब्बल १००० कोटी रुपयांचा करार केला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व जायकाच्या अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) या करारावर सह्या केल्या. जानेवारी २०२२ हा शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होणार आहे.
पुण्यातून वाहणारी ही नदी मोठ्या प्रमाणात दूषित असून या नदीचे शुद्धीकरण व्हावे अशी मागणी ब-याच काळापासून पुणेकरांकडून करण्यात येत आहे. अखेर आज केंद्र सरकारने याबाबत जपानी कंपनीशी करार केला आहे
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील ३०२ प्रदूषित नद्यांची यादी तयार केली होती, ज्यात मुळा-मुठा नदीचा समावेश आहे. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेअंतर्गत (एनआरसीपी) जपानी कंपनीशी हा करार झाला. या शुद्धीकरणासाठी जायका कंपनीने दिलेले १ हजार कोटींचे कर्ज फेडण्यासाठी ४० वर्षांची मुदत मिळाली असून या करारांतर्गत ११ नवीन मल-जल शोधन यंत्र निर्माण केले जाणार आहे. या नदीच्या शुद्धीकरणावर एकूण ९९०.२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यात केंद्र सरकारचा वाटा ८४१.७२ कोटी तर पुणे महानगरपालिकेचा वाटा १४८.५४ कोटी इतका असेल.