बीडमध्ये प्रसादातून १०० जणांना विषबाधा
By Admin | Updated: April 5, 2015 01:45 IST2015-04-05T01:45:53+5:302015-04-05T01:45:53+5:30
तालुक्यातील नांदूरघाट येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसादातून १०० जणांना विषबाधा झाली.

बीडमध्ये प्रसादातून १०० जणांना विषबाधा
केज (जि़ बीड) : तालुक्यातील नांदूरघाट येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसादातून १०० जणांना विषबाधा झाली. १७ बालकांचा समावेश असून, रुग्णांवर नांदूरघाट, नेकनूर, बीड, अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कार्यक्रमात गावकऱ्यांच्या वतीने हरभरा दाळ, साखर, गुळ प्रसाद म्हणून देण्यात आला. त्यानंतर गावातील एकाने खवा आणला. त्याचेही वाटप झाले. मात्र, खवा खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, जुलाब याचा त्रास सुरु झाला.
भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संतोष हंगे यांनी तरुणांच्या मदतीने रुग्णांना खासगी जीपमधून जिल्हा रुग्णालयात हलविले. ३८ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महानंदा मुंडे, डॉ. राम देशपांडे यांनी उपचार केले. नांदुरघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सात जणांवर उपचार करण्यात आले. तर काही रुग्णांना राजेगाव, नेकनूर, चौसाळा, चिंचोलीमाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दोन बालके अत्यवस्थ : नांदुरघाट येथील अथर्व संतोष सातपुते व अभिषेक मनोज सातपुते ही चार वर्षांची दोन बालके अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरूवातीला ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. मात्र आता चिंतेचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.