१० वर्षांत इमारती मोडकळीस
By Admin | Updated: June 30, 2015 03:10 IST2015-06-30T03:10:13+5:302015-06-30T03:10:13+5:30
राज्य राखील पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) इमारती १० वर्षांतच मोडकळीस आल्यामुळे त्यांच्या बांधकामाची अंतर्गत दक्षता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१० वर्षांत इमारती मोडकळीस
डिप्पी वांकाणी, मुंबई
राज्य राखील पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) इमारती १० वर्षांतच मोडकळीस आल्यामुळे त्यांच्या बांधकामाची अंतर्गत दक्षता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
एसआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी २००३ मध्ये गोरेगावात १३ इमारती बांधण्यात आल्या. या प्रत्येकी पाच मजली इमारतींमुळे ४४८ कुुटुंबांची निवासाची व्यवस्था झाली होती. मात्र अवघ्या १० वर्षांतच मोडकळीस येऊन या इमारती मानवी वास्तव्यास अपात्र बनल्या. परिणामी, एसआरपीएफ कर्मचाऱ्यांनी २०१३ मध्ये त्यांना रामराम ठोकून आपले बस्तान अन्यत्र हलविले, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटसाठी (इमारतीच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी करण्यात आलेला प्राथमिक तांत्रिक सर्व्हे) शशांक मेहेंदळे नावाच्या व्यक्तीने १९ लाख रुपयांचे बिल उचलले होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाच्या अर्थसंकल्पात अशा प्रकारच्या कामासाठी कोणतीही तरतूद नसल्याची बाब मला आढळून आली. विशेष म्हणजे मोडकळीस आल्यामुळे एसआरपीएफ कर्मचारी या इमारती सोडण्याच्या तयारीत असताना त्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मी तातडीने या प्रकरणी अंतर्गत दक्षता चौकशीचे आदेश दिले. चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका मुख्य अभियंत्यास आमच्याकडे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
इमारतीचे सरासरी आयुष्य ४० वर्षांचे असताना एसआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या १३ इमारती १० वर्षांतच कशा काय मोडकळीस आल्या, याचा चौकशीत आढावा घेण्यात येणार असून यात प्रकल्पाचे व्यवस्थान पाहणारे, वास्तुविशारद किंवा तांत्रिक विभाग यापैकी कोणाचा दोष आहे हे निश्चित केले जाणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
इमारतींच्या स्लॅबला मोठमोठे तडे गेले असून, काही ठिकाणचे स्लॅब कोसळू लागले आहेत. इमारतींची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालल्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना या इमारती सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, या इमारती बांधणारा तोलानी नावाचा ठेकेदार बांधकाम व्यवसायातून बाहेर पडला असून, तो आता प्लास्टिक उद्योगात असल्याचे समजते.