मद्यपी बाइकस्वारासह तिघांना १० हजारांचा दंड
By Admin | Updated: July 30, 2016 02:31 IST2016-07-30T02:31:45+5:302016-07-30T02:31:45+5:30
मद्यपान करून पहाटेच्या वेळी घरी परतणाऱ्या बाइकस्वार आणि काही तरुणांमध्ये मारहाण झाली. चौघांनीही मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याने त्यांना अद्दल घडवण्यासाठी

मद्यपी बाइकस्वारासह तिघांना १० हजारांचा दंड
मुंबई : मद्यपान करून पहाटेच्या वेळी घरी परतणाऱ्या बाइकस्वार आणि काही तरुणांमध्ये मारहाण झाली. चौघांनीही मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याने त्यांना अद्दल घडवण्यासाठी उच्च न्यायालयाने तक्रारदार बाइकस्वारासह तीन जणांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम दोन आठवड्यांत पोलीस कल्याण निधीत जमा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने या चारही युवकांना दिला आहे.
१० जुलैच्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मालवणी येथे राहणारे १८ ते २२ वयोगटातील युवक मद्यपान करून घरी परतत होते. त्याचवेळी त्यांच्या जवळून २८ वर्षीय युवक बाइकवरून जात होता. हा बाइकस्वारही मद्यधुंद अवस्थेत होता. या बाइकस्वाराबरोबर तिघे जण होते. तर रस्त्यावरून चालणाऱ्यांचाही पाच- सहा जणांचा गट होता. रस्त्यावरून चालणारे युवक बाइकस्वारांकडे लिफ्ट मागत होते. मात्र बाइकस्वारांनी लिफ्ट न दिल्याने या दोन्ही गटांत भांडण झाले. हे भांडण इतके विकोपास गेले, की या दोन्ही गटांत हाणामारी झाली. या मारामारीत २८ वर्षीय तरुण जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालवणी पोलीस ठाण्याने तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
हा गुन्हा रद्द करण्यासाठी तिघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तक्रारदार आणि आमच्यात तडजोड झाली असल्याने आमच्यावरील एफआयआर रद्द करावा, अशी विनंती आरोपींनी केली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.
‘या वयोगटातील मुलांना अद्दल घडविण्याची गरज आहे. अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही, हा संदेश समाजात पोहोचविण्याची आवश्यकता आहे. पहाटे साडेतीन वाजता मद्यधुंद अवस्थेत बाइक चालवण्यात येते? अशी किती लोक आहेत? त्यामुळे त्यांनाही हे कळणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही तक्रारदारासह तिन्ही आरोपींना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावत आहोत,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने या चौघांनाही दोन आठवड्यांत दंडाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)