५० हजाराच्या उत्पन्नावर १० हजाराची पोटगी वैध
By Admin | Updated: November 19, 2014 00:52 IST2014-11-19T00:52:15+5:302014-11-19T00:52:15+5:30
पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असल्यास विभक्त झालेल्या पत्नीला १० हजार रुपये पोटगी देण्यात काहीच चुकीचे नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

५० हजाराच्या उत्पन्नावर १० हजाराची पोटगी वैध
हायकोर्टाचा निर्णय : कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम
राकेश घानोडे - नागपूर
पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असल्यास विभक्त झालेल्या पत्नीला १० हजार रुपये पोटगी देण्यात काहीच चुकीचे नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
याप्रकरणातील दाम्पत्य नागपूर येथील रहिवासी आहे. पती छत्तीसगडमध्ये नोकरीला असून पत्नी नागपुरात भाड्याने राहते. त्यांना अपत्य नाही. १० जुलै २००८ रोजी त्यांचे लग्न झाले होते. आपसात पटत नसल्यामुळे ते विभक्त झाले. विभक्त होण्यासाठी दोघेही एकमेकांना कारणीभूत ठरवीत आहेत. पत्नीकडून क्रूर वागणूक मिळत असल्याचा आरोप करून पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा दावा खारीज केला होता. पत्नीने पोटगीसाठी दावा केला होता. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला १० हजार रुपये मासिक पोटगी व खटल्याचा पाच हजार रुपये खर्च देण्याचा आदेश दिला. या आदेशाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. आपली मासिक कमाई केवळ तीन हजार रुपये असल्याचे पतीने तोंडीच सांगितले. त्यावर पत्नीने पतीचे आयकर कागदपत्रे सादर केलीत. त्यातून पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी नसल्याचे स्पष्ट झाले. ही बाब लक्षात घेता पत्नी १० हजार रुपये पोटगीसाठी पात्र असल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदवून पतीचा अर्ज फेटाळून लावला.