म्हाडात पोलिसांसाठी १० टक्के राखीव घरे?
By Admin | Updated: September 10, 2014 03:15 IST2014-09-10T03:15:44+5:302014-09-10T03:15:44+5:30
समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी घरादाराची पर्वा न करता कार्यरत राहणाऱ्या पोलिसांसाठी एक खूशखबर आहे.

म्हाडात पोलिसांसाठी १० टक्के राखीव घरे?
जमीर काझी, मुंबई
समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी घरादाराची पर्वा न करता कार्यरत राहणाऱ्या पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. भविष्यात म्हाडाच्या घराच्या सोडतीमध्ये त्यांना १० टक्के सदनिका राखीव असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मराठा व मुस्लीम समाजासाठी अनुक्रमे ६ व ५ टक्के घरांचा कोटा उपलब्ध होऊ शकतो. प्राधिकरणाकडून बांधल्या जाणाऱ्या घरांमध्ये या तीन घटकांसाठी स्वतंत्र आरक्षण ठेवावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती युसूफ अब्राहनी यांनी त्यांची भेट घेऊन सर्व घटकांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
महानगरामध्ये या घटकांतील वर्गांना घरांची समस्या प्रचंड भेडसावित आहे़ त्यामुळे सध्या कार्यान्वित असलेल्या विविध संवर्गांतील आरक्षणाला धक्का न लावता या घटकांना विशेष बाब म्हणून लॉटरीमध्ये सवलत देण्याचा आग्रह धरला आहे.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, ही बिरुदावली असलेले दोन लाखांवर पोलीस राज्यात कार्यरत आहेत. त्यापैकी ५० हजारांवर कुमक एकट्या मुंबईतील असून, त्यांच्या घरांची समस्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली आहे. दीड कोटीवर मुंबईकरांच्या जीवित व वित्त- मालमत्तेच्या संरक्षणासाठी सण-उत्सवाची पर्वा न करता पोलिसांना बंदोबस्तामध्ये तैनात राहावे लागत आहे.