ठेकेदाराने धरले १० लाख प्रवाशांना वेठीस

By Admin | Updated: August 3, 2016 02:36 IST2016-08-03T02:36:24+5:302016-08-03T02:36:24+5:30

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण केले आहे.

10 lakh passengers boarded by contractor | ठेकेदाराने धरले १० लाख प्रवाशांना वेठीस

ठेकेदाराने धरले १० लाख प्रवाशांना वेठीस

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण केले आहे. परंतु रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे २५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दोन तास वेळ लागत आहे. शासनाने छोट्या वाहनांना टोलमाफी दिल्यामुळे ठेकेदाराने अर्धवट राहिलेले काम पूर्ण केलेले नाही. खड्डे बुजविण्याकडेही दुर्लक्ष केले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या १० लाख प्रवाशांना वेठीस धरले आहे. रोज होणाऱ्या चक्का जाममुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे , गोवा महामार्ग, जेएनपीटी, ठाणे - बेलापूर रोडला लागून असल्यामुळे राज्यातील सर्वात जास्त वाहनांची वर्दळ असणारा रोड म्हणून सायन - पनवेल महामार्ग ओळखला जातो. रोज एक लाखपेक्षा जास्त वाहने या रोडवरून धावत असतात. किमान १० लाख प्रवासी या मार्गावरून रोज प्रवास करत आहेत. २५ किलोमीटर अंतर असणारा हा महामार्ग सहा पदरी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवू लागली होती. यामुळे हे अंतर कापण्यासाठी अनेक वेळा एक ते दीड तास वेळ लागत होता. ही कोंडी सोडविण्यासाठी काँगे्रस - राष्ट्रवादी सरकारने २०१२ मध्ये महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले. १२२० कोटी रुपये खर्च करून दहा पदरी महामार्ग केला आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बेलापूर खिंडीमध्येही रुंदीकरण केले आहे. सानपाडा,कामोठे व उरण फाट्यावर उड्डाणपूल बांधले आहेत. आवश्यक तेथे भुयारी मार्ग, पादचारी मार्ग तयार केले आहेत. जवळपास छोटे - मोठे उड्डाणपूल बांधल्याने २५ किलोमीटर अंतर ३५ मिनिटांमध्ये पूर्ण करणे शक्य होवू लागले होते. परंतु दोन वर्षामध्ये रोडवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. सानपाडा, तुर्भे, जुईनगरमधील रोड पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. यामुळे रोज सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दोन किलोमीटर अंतरावर चक्का जाम होत आहे. ७ ते ८ मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे.
महामार्गावरील खड्डे बुजविण्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. शासनाने जून २०१५ मध्ये छोट्या वाहनांना टोलमधून वगळल्यामुळे नुकसान होत असल्याचा दावा ठेकेदाराने केला असून त्यामुळे खड्डे दुरुस्तीचे काम केले जात नाही. याशिवाय कामोठेमध्ये रुंदीकरणाचे काम अपूर्ण आहे. इतरही अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली नसून तीही पूर्ण केली जात नाहीत. टोल कमी झाल्याचे कारण देत या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या दहा लाख नागरिकांची अडवणूक केली जात आहे. रोजच खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
महामार्गाचे रुंदीकरण वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केले की वाढविण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
>अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार?
महामार्गावर तुर्भे पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. नेरूळ भुयारी मार्गाचे कामही निकृष्ट झाले आहे. कामोठेमध्ये रस्ता रुंदीकरण रखडले आहे. ही कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्नही प्रवासी विचारू लागले आहेत.
>गोवा व पुणे महामार्गावरही परिणाम
पुणे, बंगळूर व गोव्याकडे जाणारी वाहतूक सायन - पनवेल महामार्गावरूनच जाते. मुंबई व पुणे रोज ये - जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही नुकसान होवू लागले आहे. कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. पूर्वी पनवेल सोडले की वाहतुकीची समस्या सुरू व्हायची, परंतु आता वाशी टोलनाक्यापासूनच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
>ठेकेदाराविषयी प्रवाशांमध्ये असंतोष
सायन पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आहे. परंतु सदर कंपनीने छोट्या वाहनांना टोलमधून सूट दिल्यामुळे देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. वास्तविक राज्य शासनाने गतवर्षी प्रत्येक महिन्याला जवळपास ३ कोटी ८५ लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. यावर्षी ४ कोटी ६० लाख रुपयेप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. यानंतरही प्रवाशांची अडवणूक सुरू असल्याने नागरिकांमधील असंतोष वाढू लागला आहे. अशीच स्थिती राहिली तर आंदोलन करण्याचा इशारा प्रवासी देवू लागले आहेत.
>बांधकाम विभागाने सुरू केली दुरुस्ती
रोडवरील खड्ड्यांविषयी माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही ठेकेदाराला यापूर्वीच खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे बांधकाम विभागाने दोन युनिट तयार करून स्वत:च खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच यासाठी ठेकेदारही नियुक्त केला जाणार असून ते पैसे एसपीटीपीएल कंपनीकडून वसूल केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: 10 lakh passengers boarded by contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.