नोकरीच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक
By Admin | Updated: June 30, 2016 01:17 IST2016-06-30T01:17:34+5:302016-06-30T01:17:34+5:30
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

नोकरीच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक
पुणे : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
उमेश जयवंत कडलक आणि दक्षता उमेश कडलक (दोघे रा़ सेवक वसाहत, सावित्रीबाई फुले विद्यापीठ) अशी त्यांची नावे आहेत़ हा प्रकार १५ ते २७ जूनदरम्यान घडला़
याप्रकरणी प्रशांत मडके (वय ३१, रा़ सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे़ उमेश कडलक नोकरी लावून देतो, अशी माहिती मडके यांना मिळाली होती़ कडलक याने वखार महामंडळात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी लावतो, असे आश्वासन देऊन त्यासाठी २ लाख रुपये लागतील, असे सांगितले़ मडके यांनी स्वत:साठी, बहीण, मेहुणा आणि आणखी एकाला नोकरी लावावी, असे सांगितले़
त्यानुसार प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे १० लाख रुपयांपैकी काही पैसे रोख, तर काही धनादेशाद्वारे त्यांना दिले़ तरीही नोकरी न लावता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले़ तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़
उमेश कडलक याचे नातेवाईक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीला असून तो त्यांच्याकडे राहत आहे़ चतु:श्रृंगी पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतला, पण ते फरार झाले आहेत़
(प्रतिनिधी)
>४४ हजारांना लुबाडले
जेट एअरवेजमध्ये केबिन क्रू म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४४ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
मौला शेख (वय २२, रा़ भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार १८ ते २२ जूनदरम्यान घडला़ राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्याने सोशल वेबसाईटवर नोकरीसाठी आॅनलाइन जाहिरात दिली होती़ शेख यांनी त्यावर संपर्क केला असताना त्यांना जेट एअरवेजमध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कागदपत्रे मागवून घेतली़ त्यानंतर अन्य तिघांनी त्यांना वेळोवेळी संपर्क करून वेगवेगळ्या कारणाकरिता बँकेच्या खात्यात पैसे भरण्यास लावले़ त्यानंतरही नोकरी न दिल्याने शेख यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले़