अमेरिकेतील आॅनलाईन स्पर्धेचे आमिष दाखवून १० लाखांचा गंडा
By Admin | Updated: September 18, 2014 00:42 IST2014-09-18T00:42:16+5:302014-09-18T00:42:16+5:30
अमेरिकेकडून ‘हिटलर युथ बॅन्ड अवॉर्ड’ ही आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येत असून विजेत्याला १०० कोटींचे बक्षिस मिळणार असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी एका उच्चशिक्षित कुटुंंबाला लाखो रुपयांनी गंडविले.

अमेरिकेतील आॅनलाईन स्पर्धेचे आमिष दाखवून १० लाखांचा गंडा
अमरावती : अमेरिकेकडून ‘हिटलर युथ बॅन्ड अवॉर्ड’ ही आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येत असून विजेत्याला १०० कोटींचे बक्षिस मिळणार असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी एका उच्चशिक्षित कुटुंंबाला लाखो रुपयांनी गंडविले. मंगळवारी रात्री ८.४५ वाजता ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करण मुन्नालाल चौरागडे (२०, रा. मोतीनगर) व शुभम राजेश अग्रवाल (२०,रा. कल्याण नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. करण चौरागडे हा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकतो. त्याची ओळख कॅम्प परिसरातील गणेडीवाल ले-आऊट येथील रहिवासी विलास अजबसिंग ठाकूर यांच्याशी होती. ठाकूर यांना दोन मुली आहेत. यातील एक मुलगी ‘स्कॉलर’आहे. याचा फायदा घेण्याची योजना करणने आखली. अमेरिकेकडून आॅनलाईन पध्दतीने ‘हिटलर युथ बॅन्ड अवॉर्ड’ स्पर्धा घेण्यात येत असल्याची बतावणी केली. या स्पर्धेत यशस्वी झाल्यास ५०० कोटींच्या बक्षिसांचे वाटप होणार असल्याचे त्याने ठाकूर यांना सांगितले.
भारतातील व्यक्ती स्पर्धेचा मानकरी ठरल्यास त्याला १०० कोटींचे बक्षीस मिळणार असल्याचेही ठाकूर यांना पटवून देत त्याने त्यांच्या मुलीला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलीने परीक्षा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर पालकही तयार झाले. लगेच मुलीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.
परीक्षेसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम व हिटलरची बायोग्राफी उपलब्ध करुन देण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून करणने ठाकूर यांच्याकडून गेल्या पाच महिन्यांपासून जवळपास १० लाख ७० हजार ६३० रुपये उकळले.
आपली फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास येताच ठाकूर यांनी याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोलिसांनी आरोपी करण चौरागडे व शुभम अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. याप्रकरणात शुभमचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. (प्रतिनिधी)