सुरक्षा यंत्रणेला १० ग्रॅमची पेन्सीलही वाटते धोकादायक !

By Admin | Updated: November 17, 2014 03:34 IST2014-11-17T03:34:47+5:302014-11-17T03:34:47+5:30

मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनन्स यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना सुरक्षा कवच पुरविले गेले आहे

10 gm pencil in the security system, too dangerous! | सुरक्षा यंत्रणेला १० ग्रॅमची पेन्सीलही वाटते धोकादायक !

सुरक्षा यंत्रणेला १० ग्रॅमची पेन्सीलही वाटते धोकादायक !

राजेश निस्ताने, यवतमाळ
मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनन्स यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना सुरक्षा कवच पुरविले गेले आहे. परंतु याच सुरक्षा यंत्रणेला एके-४७पेक्षाही अधिक धोका हा दहा ग्रॅमची पेन्सील उचलून चित्र रेखाटणाऱ्या कलाकारांचा वाटतो आहे, अशी खंत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांनी व्यक्त केली.
वासुदेव कामत यवतमाळात आले असता त्यांनी सांस्कृतिक व कलाक्षेत्राबाबतची शासकीय उदासीनता, सुरक्षा यंत्रणेचा जाच याबाबत ‘दर्डा उद्यान’ येथे ‘लोकमत’कडे आपले मन मोकळे केले. कामत म्हणाले, छत्रपती शिवाजी टर्मिनन्सने (व्हिक्टोरिया टर्मिनन्स) २६/११चा दहशतवाद अनुभवला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने या ऐतिहासिक स्थळाला असलेला धोका ओळखून तेथे बंदूकधारी जवान तैनात केले. मात्र या सुरक्षा व शासकीय यंत्रणेचा जाच आणि त्रासच अधिक आहे. सीएसटीसारख्या ऐतिहासिक स्थळांचे तेथे समोर बसून चित्र काढण्याचा अधिकार कलाकारांना नाही. हा कलाकार आझाद मैदानावर बसून चित्र रेखाटू शकत नाही. चित्रकाराला त्यासाठी मनाई केली जाते. एलिफंटासह सर्वच ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी हीच सुरक्षा यंत्रणा कलाकारांना आडवी येते. ऐतिहासिक स्थळांची सुरक्षा सांभाळणाऱ्या यंत्रणेला दहा ग्रॅमची पेन्सील उचलणारे चित्रकार एवढे घातक का वाटतात, याचे कोडे आपल्याला अद्यापही उलगडलेले नाही. रालोआ सरकारच्या कार्यकाळात आपण स्वत: केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर सांस्कृतिक मंत्रालयाने आपणाला पत्र पाठवून कलाकारांना कुठेही बसून ऐतिहासिक स्थळांचे चित्र रेखाटण्याची परवानगी असल्याचे त्यात नमूद केले होते.
हे पत्र घेऊन मुंबईतल्या ऐतिहासिक स्थळावर चित्र रेखाटण्यासाठी गेलो असता तेथील साध्या चपराश्याने केंद्र सरकारचा हा आदेश धुडकावून लावला. तुमच्याकडे पत्र असले तरी तसा आदेश अद्याप आमच्याकडे पोहोचला नसल्याचे सांगून या चपराश्याने आपली बोलती बंद केल्याचा अनुभव कामत यांनी सांगितला. एकीकडे चित्रकाराला सुरक्षेच्या कारणाखाली ऐतिहासिक स्थळांपासून कोसोदूर ठेवले जाते. तर दुसरीकडे पर्यटक मात्र या ऐतिहासिक वास्तू, शिल्पांशी छेडछाड करतात, त्याला कोरतात, त्याचे सौंदर्य नष्ट करतात, मात्र त्यांना यासाठी सुरक्षा यंत्रणेकडून रोखले जात नाही. आम्ही चित्र काढण्यासाठी कित्येक ठिकाणी जातो, आमचे साहित्य बेवारस पडलेले असते, मात्र ते कधी चोरीला गेले नाही. परंतु सरकारी यंत्रणेचाच जाच अधिक अनुभवायला मिळतो.
कला व सांस्कृतिक क्षेत्राबाबत शासनाच्या दुर्लक्षित धोरणावरही कामत यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्र हे मंदिर, किल्ले अशा ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध असलेले राज्य आहे. ही आपली सांस्कृतिक धरोहर आहे. परंतु त्याकडे शासनाचे लक्षच नाही.
अन्य राज्यांच्या तुलतेन महाराष्ट्रात अनेक आर्ट स्कूल, कॉलेजेस आहेत. परंतु तेथील कलाशिक्षक आजही दुर्लक्षित आहेत. मुंबईच्या १८५७मध्ये स्थापन झालेल्या जेजे स्कूल आॅफ आर्टस्ची अवस्था वाईट आहे. तेथे शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सिलॅबसचा विचार होत नाही. जेजे स्कूलची इमारत ही ऐतिहासिक वारसा आहे. मंत्रालयाच्या अधिनस्त असणे हेच या इमारतीचे दुर्दैव आहे. एखाद्या कला संस्थेने त्याचे संचलन केल्यास त्याची स्थिती सुधारू शकते, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला.
कामत म्हणाले, देशात चांगले म्युझियम नसणे, रवींद्रनाथ टागोरांचे नोबेल चोरीला जाणे, गांधींच्या चष्म्याची चोरी होणे ही शासनाच्या सांस्कृतिक क्षेत्राकडील उदासीनतेची लक्षणे आहेत. शासन आणि कलाप्रेमी जागरूक न झाल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

Web Title: 10 gm pencil in the security system, too dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.