लोकसहभागातून १0 ‘डिजिटल’ शाळा

By Admin | Updated: February 15, 2016 02:08 IST2016-02-15T02:08:54+5:302016-02-15T02:08:54+5:30

कारंजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा पुढाकाराने १0 ‘डिजिटल’ शाळा.

10 'digital' schools in the public sector | लोकसहभागातून १0 ‘डिजिटल’ शाळा

लोकसहभागातून १0 ‘डिजिटल’ शाळा

प्रफुल्ल बाणगावकर/ कारंजा लाड : शहरी भागातील इंग्रजी शाळांकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा असताना, कारंजा तालुक्यात शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांनी लोकसहभागातून तालुक्यात १0 डिजिटल शाळा सुरू करण्यात यश मिळविले.
इंग्रजी शाळांच्या प्रभावामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्येत कमालीची घट होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कारंजा तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शासनाची हाक अन् शाळा विकासासाठी मिळालेला निधी व गावकर्‍यांचा लोकसहभाग घेऊन १0 डिजिटल शाळा सुरू करण्यात आल्या. तालुक्यात डिजिटल शाळा या प्रकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली, ती झोडगा बु. येथील जिल्हा परिषद शाळेत. पोहा येथील जिल्हा परिषदेची शाळा ही तालुक्यातील दहावी डिजिटल शाळा ठरली.
पोहा येथील डिजिटल शाळेचे उद्घाटन कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या हस्ते तसेच मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना डिजिटल युगात संगणकाच्या माध्यमातून शिक्षण द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील पालकांकडून व्यक्त करण्यात येत असून, ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाला सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या संमतीने एक अभिनव संकल्पना राबविण्याचे ठरविले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांना नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शासनाकडून शाळांना मिळणारे १७ हजार ५00 रुपये अनुदान आणि लोकवर्गणीतून ३२ हजार ५00 रुपये असे एकूण ५0 हजार रुपये खर्च करून डिजिटल शाळा सुरू करण्याची किमया तालुक्यातील १0 शाळांतील शिक्षक वृंदाने केली आहे.
कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्या पुढाकाराने ३२ हजार ५00 रुपये लोकवर्गणीतून गोळा करण्यासाठी शाळेचे शिक्षक व गावकर्‍यांनी प्रयत्न केले आणि १0 डिजिटल शाळा सुरू करण्यात त्यांना यश मिळवले. तालुक्यात झोडगा, पोहा, काळी कारंजा, धोत्रा जहागीर, येवता, खेर्डा कारंजा, ढंगारखेड (मराठी), ढंगारखेड (उर्दू), मोखड (मराठी), सुकळी येथे डिजिटल शाळा कार्यान्वित झाल्या आहेत.

Web Title: 10 'digital' schools in the public sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.