म्हाडाकडे दाखल झाले १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज!
By Admin | Updated: June 10, 2014 01:10 IST2014-06-09T23:05:16+5:302014-06-10T01:10:11+5:30
म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली असून, ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांना बँकेत डीडी सादर करण्याची अंतिम तारीख ११ जून आहे.

म्हाडाकडे दाखल झाले १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज!
म्हाडाकडे दाखल झाले १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज!
मुंबई : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली असून, ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांना बँकेत डीडी सादर करण्याची अंतिम तारीख ११ जून आहे. त्यानंतर १९ जूनला स्वीकृत अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, २५ जूनला म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. दरम्यान, ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या एकूण ऑनलाईन अर्जांची संख्या १ लाख २३ हजार २५४ एवढी आहे.
म्हाडा लॉटरीसाठी मुंबई आणि कोकण मंडळाच्या एकूण सदनिकांची संख्या एकूण २ हजार ६४१ एवढी आहे. लोकसभा निवडणूकांमुळे म्हाडा लॉटरी प्रक्रियेस विलंब झाला होता. त्यातच सदनिकांच्या किंमतीत म्हाडाने घोळ घातल्याने समस्येत आणखीच भर पडली. शिवाय म्हाडा लॉटरीतील घरांसाठी मिळणारा कमी प्रतिसाद पाहता म्हाडाने अर्ज करण्यासाठीची मुदत वाढविली. आणि १५ जूनऐवजी २५ जूनला लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय सदनिकेच्या किंमतीचा गोंधळ कमी करण्यासाठी प्राधिकरणाने मंजूर केलेल्या किंमतीच्या धोरणाला अनुसरून म्हाडाने मुंबई, विरार व वेंगुर्ल्यातील घरांच्या किमतींमध्ये १०.५ टक्के कपात केली.
दरम्यान, ९ जून रोजी ऑनलाईन अर्जाची मुदत संपल्यानंतर सदनिकांसाठी म्हाडाकडे दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या १ लाख २३ हजार २५४ एवढी आहे. यात मुंबई मंडळाकडे दाखल झालेल्या अर्जाची संख्या १ लाख १० हजार ९१० एवढी आहे. आणि यातील ७४ हजार १३६ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. तर कोकण मंडळाकडे दाखल झालेल्या अर्जांची संख्या १२ हजार ३४४ एवढी आहे. यातील ७ हजार ९३४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे, अशी माहिती म्हाडाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)