अवघ्या तीन तासांत १९१ अर्ज

By Admin | Updated: June 8, 2016 02:02 IST2016-06-08T02:02:26+5:302016-06-08T02:02:26+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला

1 9 1 applications in just three hours | अवघ्या तीन तासांत १९१ अर्ज

अवघ्या तीन तासांत १९१ अर्ज

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंगळवारपासून विद्यार्थ्यांनी वाशी येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गर्दी केली असून अवघ्या तीन तासांत छायाप्रतींसाठी १९१ अर्ज दाखल झाल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत असमाधान असल्याने छायांकित प्रत तसेच गुणपडताळणी विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येतो.
दहावी- बारावीच्या निकालानंतर वाशीतील बोर्डात अर्जांचा पाऊस सुरु झाला आहे. छायाप्रतींचे शुल्क प्रत्येक विषयाला ४०० रुपये इतके, गुणपडताळणीसाठी ५० रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. दहावीसाठी छायांकित प्रतीसाठी २७ जून ही शेवटची तारीख असून गुणपडताळणीसाठी १६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये आकारण्यात येणारे शुल्क रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने संबंधित विभागीय मंडळामध्ये जमा करण्याच्या सूचनाही बोर्डाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही अर्ज भरण्यासाठी वाशीतील शिक्षण मंडळाकडे धाव घेतली आहे.
गुण पडताळणीकरिता अर्जासोबत गुणपत्रिकेची प्रत (संकेतस्थळावरील प्रिंटआऊट) जोडणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशाकरिता मुंबई विभागातील मान्यताप्राप्त शाळांची संख्या ११५६ इतकी असून यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई १ आणि मुंबई २ यांचा समावेश आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
हल्लीचे विद्यार्थी मिळालेल्या गुणांनी समाधानी नाहीत. आपली स्वत:ची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत असून छायाप्रतीच्या पर्यायामुळे विद्यार्थ्यांना स्वत:चा आरसा पाहण्याची संधी मिळते. यंदा गुणपडताळणी तसेच छायाप्रतीसाठीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. सुभाष बोरसे, सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
बारावीच्या १६१९ विद्यार्थ्यांचे अर्ज
बारावीच्या निकालानंतर गुणपडताळणीकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून असून १६१९ विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. यामध्ये कला शाखेतील १२३ विद्यार्थी, वाणिज्य शाखेतील ५०९ आणि विज्ञान शाखेतील ९७७ अर्ज आले आहेत. छायांकित प्रतीसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना १४ जूनपर्यंत अर्ज करता येणार असून सोमवारपर्यंत आलेल्या अर्जांची संख्या ५ हजार ९६८ इतकी आहे. यामध्ये कला शाखेतील २३१, वाणिज्य शाखेतील १६६० आणि विज्ञान शाखेतील ४०९५ अर्ज आल्याची माहिती बोर्डाने दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट अर्ज येण्याची शक्यता बोर्डाकडून वर्तवण्यात येत असून १४ जूनपर्यंत अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.

Web Title: 1 9 1 applications in just three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.