लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ येत असतानाच उमेदवारांच्या प्रचारालाही जोर आला आहे. अनेक नेते आणि उमेदवार गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमधील बैतूल-हरदा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार दुर्गादास उईके यांना प्रचारादरम्यान, मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागला. दुर्गादास उईके हे महतपूर गावामध्ये प्रचारासाठी गेले असताना तिथे स्थानिकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विकास कामं तर केली नाहीत, पण पाच वर्षांत किमान एकदा तरी दर्शन देण्यासाठी यायचे, असा टोला मतदारांनी उईके यांना लगावला. त्यामुळे भरसभेत त्यांची चांगलीच नाचक्की झाली.
मतदारांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना भाजपा उमेदवार दुर्गादास उईके यांनी गपगुमान आपलं रिपोर्टकार्ड मांडणं सुरू ठेवलं. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दुर्गादास उईके यांच्यासोबत भाजपा आमदार चंद्रशेखर देशमुख आणि पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
महतपूर गावात दुर्गादास उईके यांची प्रचारसभा सुरू असताना एका मतदाराने माईक आपल्या हाती घेतला. तसेच त्यानंतर त्याने खारदारांवर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली. या मतदाराचं नाव होशियारसिंह तुरिया आहे. ते म्हणाले की, पाच वर्षांपासून ग्रामस्थ हायस्कूलची मागणी करत आहेत, ती पूर्ण झाली नाही. पाच वर्षांत तुम्ही एकदाही गावात आला नाहीत. काम करता येत नसतील, तर किमान भेटायला तरी येत जा. आता महतपूरचे ग्रामस्थ कुठल्याही पक्षाला मत देणार नाहीत. ग्रामस्थांनी नोटाला मतदान करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहितीही समोर येत आहे.