मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तापी खोरे मेगा रिचार्ज योजनेच्या महत्त्वपूर्ण करारावर सह्या झाल्या आहेत. या योजनेमुळे मध्य प्रदेशमधील एक लाख आणि महाराष्ट्रामधील दोन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या या संयुक्त योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र आंतरराज्यीय नियंत्रण मंडळाच्या २८ व्या बैठकीनंतर दोन्ही सरकारमध्ये हा करार झाला आहे. ही बैठक मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील कुशाभाऊ कन्व्हेंशनल सेंटरमध्ये झाली. या बैठकीला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाची औपचारिकता पार पडल्यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी करारावर सह्या करून फाईलचे आदान प्रदान केले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील संबंधांच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. दोन राज्यांमध्ये होत असलेल्या नदीच्या कराराकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. गोदावरी आणि तापी नदीबाबत आमचे आणि महाराष्ट्राचे खास संबंध आहेत. तापी नदीचं महत्त्व हे नर्मदा नदीप्रमाणे आहे. मध्य प्रदेश हे नद्यांचं माहेरघर आहे. येथून सुमारे २४७ नद्या वाहतात. आमच्या राज्यात कुठलाही हिमनग नाही आहे. मात्र आमच्याकडे जलसाठा एवढा आहे की, गंगा यमुनेपेक्षा अधिक पाणी आमचं राज्य इतर भागांना देतं. आमच्या राज्यातील नद्या ह्या देशातील प्रत्येक राज्यातील नदीशी जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच त्यांना पाणीपुरवठा करत आहेत.
मोहन यादव पुढे म्हणाले की, तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्प नैसर्गिक आहे. संपूर्ण जगात यापेक्षा चांगला प्रकल्प कुठेच नाही आहे. पाण्याच्या टंचाईमुळे अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागल होता. आता हा प्रकल्प पूर्ण निमाड भागासाठी जीवन रेषेचं काम करेल, याचा मला आनंद आहे. या प्रकल्पामुळे भूजलसाठ्यामध्ये वाढ होईल. तसेच सिंचनाची चांगली सोय होईल. आम्ही महाराष्ट्रासोबत मिळून आपला जुना वारसा जीवित करू. महाराष्ट्रातील बंदरांमधून व्यापार वाढवू. जबलपूरपासून नागपूरपर्यंत एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर बनवण्यात येईल. त्यामुळे खर्चात बचत होईल. तसेच मध्य प्रदेशमधील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर यांना नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वर यांच्याशी जोडून धार्मिक पर्यटनाचं सर्किट बनवण्यात येईल, असेही मोहन यादव यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण अनेक वर्षांपासून तापी रिचार्ज प्रकल्प संकल्पित होता. मात्र तो काही कारणांमुळे लांबणीवर पडलेला होता. आज दोन्ही राज्यांची त्यावर सहमती झाली आहे. तसेच आमच्या त्यावर सह्याही झाल्या आहेत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रकल्पाच्या कामासाठी जी गतिशिलता दाखवली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.
तापी बेसिन मेगा रिचार्ज योजना ही जगातील सर्वात मोठी ग्राऊंड रिचार्ज योजना आहे. या मेगा रिचार्ज योजनेमध्ये ३१.१३ टीएमसी पाण्याचा उपयोग होईल. यातल ११.७६ टीएमसी पाणी मध्य प्रदेशला तर १९.३६ टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळेल. या योजनेमधून मध्य प्रदेशमधील १ लाख २३ हजार ८२ हेक्टर आणि महाराष्ट्रातील २ लाख ३४ हजार ७०६ हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येईल.