एखाद्या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करत असताना तिथे असणारे भटके कुत्रे हे बऱ्याचदा वाहन चालकांच्या डोकेदुखीचं कारण ठरतात. बऱ्याचदा या कुत्र्यांमुळे अपघातही होतात. तसेच पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अचानक अंगावर आलेल्या या कुत्र्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी या कुत्र्यांचे मालक भांडण उकरून काढतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे घडली. इथे अंगावर आलेल्या कुत्र्यांवर दगड भिरकावल्याने दुचाकीस्वार तरुणाला एका कुत्र्याचे मालक असलेल्या जोडप्याने बेदम मारहाण केली. आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भोपाळमधील गोविंदपुरा इंडस्ट्रियल परिसरात एका तरुण मुलीला शाळेत सोडण्यासाठी स्कूटीवरून जात होता. त्याचदरम्यान रस्त्यामधील काही भटके कुत्रे त्यांच्या मागे लागले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून त्याने कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी त्यांच्यावर दगड भिरकावले. मात्र त्याला कुत्र्यावर दगड भिरकावताना पाहून तिथे कुत्र्याचं मालक असलेलं एक जोडपं आलं. त्यांनी या दगड मारणाऱ्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाजूला असलेली त्या तरुणाची मुलगी विनवण्या करत होती. मात्र हे जोडपं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. एकीकडे हे जोडपं मारहाण करत असताना कुत्रेही त्याच्यावर हल्ला करत होते.
दरम्यान, तिथून जात असलेल्या एका दुचाकीस्वार तरुणाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे जोडपं ऐकून घेत नव्हतं. दरम्यान, हा प्रकार पाहून तिथे गर्दी झाली. त्यानंतर हे मारहाण करणारं जोडपं तिथून काढता पाय घेऊन निघून गेलं.