उजनीच्या सरपंचपदी युवराज गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST2021-02-13T04:19:33+5:302021-02-13T04:19:33+5:30
औसा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या उजनी ग्रामपंचायतीची दुरंगी निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. त्यात योगीराज पाटील यांच्या जनसेवा ...

उजनीच्या सरपंचपदी युवराज गायकवाड
औसा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या उजनी ग्रामपंचायतीची दुरंगी निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. त्यात योगीराज पाटील यांच्या जनसेवा ग्रामविकास पॅनेलला ८, तर प्रवीण कोपरकर यांच्या संत गणेशनाथ ग्रामविकास पॅनेलला ७ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सुरुवातीपासून रस्सीखेच सुरू होता.
निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची बैठक सरपंच व उपसरपंच निवडीसाठी बोलाविण्यात आली होती. यात सरपंच पदासाठी युवराज गायकवाड, अक्षरा चव्हाण आणि लक्ष्मी सगट यांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, सगट यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने दुरंगी लढत झाली. यात गायकवाड यांना ८, तर चव्हाण यांना ७ मते पडल्याने यात युवराज गायकवाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिका-यांनी जाहीर केले.
उपसरपंचपदासाठी शर्मिला शेळके, योगीराज पाटील आणि प्रवीण कोपरकर यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान, शेळके यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने निवडीसाठी मतदान घेण्यात आले. त्यात पाटील यांना ८, तर कोपरकर यांना ७ मते मिळाली. त्यामुळे उपसरपंचपदी योगिराज पाटील यांची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिका-यांना तलाठी गोविंद कुंभार, ग्रामविकास अधिकारी आर. आर. सावंत यांनी सहाय्य केले. यावेळी शेखर चव्हाण, मजहरखाँ पठाण, रंजना रंदवे, शालू कोळी, शमिना शेख, लक्ष्मी सगट, प्रवीण कोपरकर, अनिल कळबंडे, शाम सूर्यवंशी, विजया ढवण, शर्मिला वळके, अक्षरा चव्हाण, दीपाली देवकर यांची उपस्थिती होती. नूतन सरपंच व उपसरपंचांचा गावकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुका सचिव चंद्रकांत ढवण, मन्सूर रुईकर, धनराज पाटील, युवराज ढवण, संजय रंदवे, खाजामिया शेख, दिलीप कागे, बसवराज बर्दापुरे, नटराज जोशी, मुकेश पाटील, बाबूराव ढवण, नामदेव पेठकर, बशीर शेरीकर, आयुब रुईकर, दाजी जांभाळे, बालाजी जाधव, व्यंकट पाटील, गुणवंत कागे, सागर ढवन, हरी ढवण आदींची उपस्थिती होती.
योगिराज पाटील यांचे वर्चस्व...
योगिराज पाटील यांच्या पॅनेलचे ८, तर प्रवीण कोपरकर यांच्या पॅनेलचे ७ उमेदवार विजयी झाल्याने सरपंच, उपसरपंच पद आपल्या गटाकडे ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू होते. त्यामुळे विजयी सदस्यांची मनधरणी करण्यात येत होती. परिणामी, पॅनेलप्रमुखांना विजयी उमेदवार आपल्यासोबत ठेवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली होती. अखेर आजच्या निवडीत योगीराज पाटील हे गढ राखत सरपंच व उपसरपंचपद आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले. सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने युवराज गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. या निवडीनंतर गावात जल्लोष करण्यात आला.