महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून कमळेवाडी (ता. मुखेड) येथील ३२ वर्षीय राज्य कर निरीक्षकाने लातुरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. रामदारस मोहन श्रीरामे असे मयताचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, नांदेड जिल्ह्यातील कमळेवाडी येथील मूळचे असलेले रामदास श्रीरामे हे सध्या नागपूर येथे शासकीय विभागात बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यान, ते घरी अमरावती येथे प्रशिक्षणासाठी जात आहे, असे सांगून घराबाहेर पडले होते. सोमवारी लातुरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या हॉटेल नंदनवन लॉजवर ते उतरले. त्यांनी येथील २०८ क्रमांकाची खोली बुक केली. पहिल्या दिवशीची रक्कम त्याने लॉज व्यवस्थापकाकडे जमा केली होती.
दरम्यान, मंगळवारी दुसऱ्या दिवशीची रक्कम जमा करण्याबाबत व्यवस्थापकाने खोलीचे दार ठोठावले. आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. व्यवस्थापकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गांधी चौक पोलिस ठाण्याच्या बीट अंमलदार याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, रामदास श्रीरामे हे गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत सुनीलकुमार शंकरराव जाधव (वय ५६, रा. जेल रोड, बीदर) यांच्या माहितीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामदास श्रीरामे यांनी प्रारंभी शिक्षक म्हणून त्यांनी सेवा सुरू केली. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या हुद्यावर पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न होते. गत पाच वर्षांपासून ते राज्य कर निरीक्षक (एसटीआय) म्हणून कार्यरत होते. नव्याने त्याची नागपूर विभागामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली होती. चार महिन्याचे प्रशिक्षण आहे, असे सांगून ते घरातून बाहेर पडले. एमपीएससीत कमी गुण मिळाल्याने त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली, असे कुटुंबीयांनी सांगितले, अशी माहिती लातूर पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी दिली.