तरुणांनी रेशीम शेतीकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:53+5:302021-03-19T04:18:53+5:30
रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित उद्योग असून त्यात रोजगाराची मोठी क्षमता आहे. प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या क्षेत्रामध्ये ...

तरुणांनी रेशीम शेतीकडे वळावे
रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित उद्योग असून त्यात रोजगाराची मोठी क्षमता आहे. प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या क्षेत्रामध्ये या उद्योगास पोषक वातावरण असल्याने रेशीम उत्पादन करण्यास भरपूर वाव आहे. त्यातून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी तीर्थकर यांनी केले.
पोखरा योजनेंतर्गत आणि महारेशीम अभियानांतर्गत दीनानाथ नागरगोजे यांच्या बागेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ शेतकरी देवनाथ नागरगोजे, विठ्ठल भांगे, नईम सय्यद, शाबुद्दीन सय्यद, दादाराव नागरगोजे, सतीश नाईक आदी उपस्थित होते. तसेच सोनवळा व लाळी (बु.) येथील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तीर्थकर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत आहे. हवामानातील बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने रेशीमवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे या घटकाचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.