दुग्ध वाहतुकीच्या व्यवसायातून तरुणाने शोधला नवा रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:52+5:302021-03-01T04:22:52+5:30
कोरोनाच्या कालावधीत लागू झालेल्या लाॅकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असली, तरी शेंद (उत्तर) येथील बाळू ...

दुग्ध वाहतुकीच्या व्यवसायातून तरुणाने शोधला नवा रोजगार
कोरोनाच्या कालावधीत लागू झालेल्या लाॅकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असली, तरी शेंद (उत्तर) येथील बाळू शेळगे या युवकाने मोटारसायकलवर अनेकांच्या दुधाच्या कॅनची वाहतूक करून दुग्ध वाहतुकीच्या व्यवसायातून नवा रोजगार शोधला आहे. शेंद (उत्तर) येथून शंभुउंबरागा येथे दूध देण्यासाठी जी फेरी होत होती. त्या जाण्या-येण्याचा कुशलतेने वापर करून गावातील तीस ते चाळीस लोकांच्या दुधाचे कॅन घेऊन जायचे आणि एका कॅनला दहा रुपये घ्यायचे. त्यामुळे त्याच्याकडील दूध विकण्याचे काम तर होत आहे, शिवाय त्यातून दररोज तीनशे ते चारशे रुपयांची कमाईही होत आहे. त्यामुळे मंदीतही रोजगाराची नवी संधी शोधली आहे. परिणामी, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खुबीने मोटारसायकलचा वापर...
तरुणांना विविध प्रकारच्या मोटारसायकलचा जणू छंदच लागला असून, छोट्या-छोट्या कामासाठीही मोटारसायकलचा वापर केला जात आहे. त्यामुळेच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, बाळू शेळगे याने खुबीने मोटारसायलचा वापर केला आहे. तीस ते चाळीस दुधाचे कॅन घेऊन जाण्यासाठी लोखंडी स्टँड बनवून घेतले आहे. दूध वाहतुकीचे काम संपले की, मोटारसायकलचा दुसऱ्या कामासाठी वापर केला जातो. त्यामुळे मोटारसायकलचा खुबीने वापर सुरू झाला आहे.
मंदीत रोजगाराची संधी....
कोरोनामध्ये अनेकांचा रोजगार गेला आहे. परिणामी, नैराश्यात सापडलेले अनेक जण नवीन रोजगार, उद्योग, व्यवसाय नाेकऱ्या शोधत आहेत. मात्र, मंदीत कोणालाही संधी मिळत नाही. बाळू शेळगे याने मंदीतही रोजगाराची नवी संधी शोधली आहे. दररोज तीनशे ते चारशे रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.