शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हरभऱ्याचा उतारा निम्याने घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST2021-03-08T04:20:15+5:302021-03-08T04:20:15+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील तीन चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मागील वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हरभऱ्याचा उतारा निम्याने घटला
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील तीन चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मागील वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे घरणी, साकोळ, डोंगरगाव, पांढरवाडी मध्यम प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले होते. त्यामुळे रब्बी हंगामाच्या नियोजित क्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक वर्षी ११ हजार ८०० हेक्टर्समध्ये रब्बी हंगाम घेण्यात येतो. पण, यंदा त्यात चांगलीच वाढ झाली असून, १६ हजार ५४९ हेक्टर्स मध्ये रब्बीची पिके घेण्यात आली आहेत. यामध्ये हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा करण्यात आला आहे. हरभऱ्याचे चांगले उत्पादन होऊन आर्थिक लाभ होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात केली होती. सध्या सर्वत्र हरभऱ्याची काढणी सुरू असून, मोठ्या प्रमाणात राशी केल्या जात आहेत. परंतु, हरभऱ्याचा उतारा निम्म्याने घटला असल्याने लागवडीचा खर्चही पदरी पडेल की नाही, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
१३ हजार ७३३ हेक्टरांवर हरभरा...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात रब्बीच्या क्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, १६ हजार ५४९ हेक्टर्सवर रब्बी पिके घेण्यात आली असली तरी त्यांपैकी १३ हजार ७३३ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे. सध्या हरभऱ्याच्या राशीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी राशी करण्यात मग्न आहेत. मात्र, हरभऱ्याचा उतारा निम्म्याने घटल्याने लागवडीचा खर्चही पदरी पडेल की नाही, याची खात्री नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
एकरी केवळ चार कट्टे उतारा...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे. कोरडवाहू हरभऱ्याचा एकरी आठ ते दहा कट्टे उतारा अपेक्षित आहे. मात्र, हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केवळ चार ते पाच कट्टे उतारा येत असल्याने हरभऱ्याचा उतारा निम्म्याने घटला असल्याचे श्रीशैल बिरादार, योगेश बिरादार, सीताराम पाटील, विनोद बिरादार यांनी सांगितले.