लातूर : कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, आता नववी आणि दहावीच्या गुणांवर यंदाचा दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची घोषणा शासनाने केली. त्याचे पालक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून स्वागत होत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षातील म्हणजे ९ वीमधील व अन्य चाचण्यांमध्ये मिळालेल्या गुणांपैकी ५० टक्के गुण आणि दहावीमधील अंतर्गत २० गुण आणि परीक्षेवरील ३० गुण असे एकूण प्रत्येक विषयांचे शंभर गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. याबाबतची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केल्यामुळे विद्यार्थ्यांवरील दडपण कमी झाले, असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, दहावीच्या आधारित अभ्यासक्रमावर अकरावीची सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आता दहावीचा अभ्यास करण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची नाही, अशा विद्यार्थ्यांना सूट देण्यात आलेली आहे तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल मान्य नसेल तर त्या विद्यार्थ्यांना पुनर्रपरीक्षा देता येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या निर्णयात नमूद आहे.
दहावीचे एकूण विद्यार्थी - ४२, ५०९
मुले - २३,८०५
मुली - १८, ७०४
उत्तीर्णतेबाबत शासनाच्या सूचना...
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेबाबत शासनाने २८ मे रोजी काढलेला जीआर सर्वसमावेशक आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्रपरीक्षार्थी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी, श्रेणी सुधारसाठी बसलेले विद्यार्थी, खासगी १७ नंबर फार्म भरून बसलेले विद्यार्थी या सर्वांसाठी शासनाने उत्तीर्णतेबाबत विविध सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. याशिवाय श्रेणी सुधारसाठी विद्यार्थी दोन संधीमध्ये पुढे परीक्षा देऊ शकतात. अकरावी प्रवेशाबाबत १०० गुणांची सीईटी परीक्षा होणार असल्याने प्रवेशाचाही प्रश्न सुटलेला आहे.
पालक, विद्यार्थ्यांमध्ये निर्णयाचे स्वागत...
सद्याच्या परिस्थितीत शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. फक्त ज्या शाळांनी वर्षभरात मूल्यमापनाची व्यवस्था केली नाही अशा शाळांची अडचण होईल. शासनाने सुचविलेली पद्धत ही रास्त आहे. त्यानुसार ज्या शाळांनी सुरुवातीपासूनच गृहपाठ, चाचण्या, परीक्षांवर भर दिलेला आहे, त्या शाळांना काहीच अडचण येणार नाही. परीक्षा रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा देण्याची मानसिकता विद्यार्थ्यांची नसते. त्यामुळे हा पर्याय चांगला असल्याचे मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी सांगितले.
पालक काय म्हणतात...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. सर्व विद्यार्थ्यांचे एकाच वेळेस परीक्षा घेणे त्रासदायक ठरले असते. त्यामुळे नववी आणि दहावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविणे हे योग्य आहे. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे.
- संगमेश्वर शिवणे, पालक
शाळा बंद असल्याने मुले अभ्यास चांगला करत होते. अचानक परीक्षा रद्द केल्यामुळे मुलांनी अभ्यास करणं बंद केले. त्यामुळे आता शासनाने घेतलेले निर्णय योग्य आहे पण परीक्षा होणे गरजेचे होते. आता सीईटी घेण्यात येणार असली तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ द्यावा.
- राहुल महाजन, पालक
पुढील प्रवेशाचे काय...
अकरावी वर्गासाठी प्रवेश घेण्यासाठी सीईटी घेतली जाणार आहे. यासाठी दहावीचा अभ्यासक्रम राहणार असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. विद्यार्थी सीईटी परीक्षेच्या तयारीला लागले असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...
सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत मानवतेच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. अकरावी परीक्षेसाठी सीईटी घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळणार आहे; परंतु, त्यासाठी दहावीच्या अभ्यासाचा सराव महत्त्वाचा आहे. शाळांना आता वेळेत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा निकाल तयार करावा लागणार आहे.
- प्राचार्य अनिल मुरकुटे, डायट, लातूर
विद्यार्थ्यांच्या निकालासाठी शाळांना नववी आणि दहावीच्या कालावधीतील मूल्यमापन करावे लागणार आहे. पुढील अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी महत्त्वाची असून, निर्णय योग्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार असून, गुणवंतांना योग्य न्याय मिळणार आहे. लवकर निकाल लागल्यास सीईटी वेळेतच होईल.
- रावसाहेब भामरे, शिक्षक
दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शाळांच्यावतीने ऑनलाईन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याद्वारे मूल्यमापन करणे सोपे जाणार आहे. विशेष म्हणजे नववीच्या वर्गातील कामगिरीही ग्राह्य धरली जाणार आहे. त्याबाबत शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षा रद्दचा निर्णय योग्य असून, काेराेनाच्या या स्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार महत्त्वाचा आहे.
- सतीश सातपुते, शिक्षक