राजकुमार जोंधळे, लातूर: बसप्रवासात महिलांचे मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका महिलेला लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. पोलिसांनी आरोपी महिलेकडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले. चौकशी दरम्यान आरोपी महिलेने याआधीही चोरी केल्याची कबूली दिली.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या चोरी, चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करण्याचे, गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा डेटा संकलित केला. तसेच खबऱ्यांकडून माहितीही मिळविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात एक महिला लातुरातील बसस्थानक क्रमांक २ परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने बस स्थानक परिसरात संशयास्पद वावरणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता ती महिला बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. लातूरसह जिल्ह्यात विविध बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरल्याचे कबूल केले. अहमदपूर ठाण्यात दोन गुन्हे, शिवाजीनगर ठाण्यात एक अशा तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला.
ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, विनोद चालवाड, तुळशीराम बरुरे, महिला अंमलदार चिखलीकर, चालक प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली आहे.