लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने आता लालपरीला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमचा आधार दिला जात आहे. प्रवाशांना घरबसल्या एस. टी. बसचे लाेकेशन पाहता येणार आहे. स्वातंत्र्यदिनी याचा लाेकार्पण साेहळा हाेणार हाेता. मात्र, ताे मुहूर्त आता लांबणीवर पडला आहे. सध्या लातूर विभागातील ४९० बसेसना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामध्ये लातूर आगार - ११५, उदगीर - ११३, अहमदपूर - ९३, निलंगा - ८७ आणि औसा आगारातील ८२ बसेसना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. लालपरी आता नवतंत्रज्ञानाने अपडेट हाेत आहे.
बस कुठे आहे हे आधीच कळणार...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने सुरु करण्यात आलेली व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आल्याने प्रवाशांना आता आपल्या माेबाईल स्क्रिनवर बस कुठे आहे, कुठल्या मार्गावर आहे याचे संपूर्ण लाेकेशन क्षणात पाहता येणार आहे. बस कुठल्या थांब्यावर किती वेळ थांबली आहे, हेही पाहता येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाचा हुकला लाॅचिंगचा मुहूर्त...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने या ॲपचे लाॅचिंग हाेणार हाेते. त्यासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्तही ठरला हाेता. या मुहुर्तावर ॲपचे लाॅचिंग झाले नाही. सध्या हा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. अशास्थितीत ही यंत्रणा राज्यातील काही जिल्ह्यांत कार्यान्वित झाली आहे.
लाेकेशन यंत्रणा सुरु...
लातूर विभागात एकूण ४९० बसेस आहेत. या सर्वच बसेसना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामध्ये लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारांमधील बसेसचा समावेश आहे. राज्यस्तरावरील लाेकार्पण साेहळा काही कारणास्तव रद्द झाला असला, तरी लातुरात मात्र ही यंत्रणा सुरु झाली आहे.
- अभय देशमुख, वाहतूक अधिकारी, लातूर