बांधकाम साहित्य महागल्याने सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:16+5:302021-07-25T04:18:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत बांधकाम साहित्याच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे ...

बांधकाम साहित्य महागल्याने सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत बांधकाम साहित्याच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे किंवा नवीन घराचे बांधकाम करण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळू, सिमेंट, खडी, स्टील, विटा आदी साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्लॉट घेऊन बांधकाम करणाऱ्यांना तर महागाईमुळे बांधकाम बंद ठेवावे लागत असल्याचे चित्र आहे.
शहरापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग...
लातूर शहरापासून जवळच असलेल्या नवीन वसाहती परिसरात रो-हाऊस, फ्लॅटची बांधकामे सुरु आहेत. शहराच्या तुलनेत शहरापासून दूर घरे स्वस्त आहेत. मात्र, अप-डाऊन करण्यासाठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
शहरात शाळा, महाविद्यालये जवळ असल्याने अनेकांनी मुलांच्या सोयीसाठी शहरातच राहणे पसंत केले आहे. शहराच्या बाहेर घर घेतल्यास शाळा, महाविद्यालयात येण्याची सोय नसल्याचेही अनेकांचे मत आहे.
कोरोनाच्या काळात शहराबाहेर अनेक बांधकामाच्या साईट सुरु झाल्या आहेत. मात्र, अनेकांच्या व्यवसायाला कोरोनाचा फटका बसल्याने नवीन घरांची विक्री होण्यास काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
बँकाचे गृहकर्ज झाले स्वस्त...
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक, सहकारी बँकाच्यावतीने घर खरेदीसाठी विविध आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. मात्र, कोरोनामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी ते घेण्यास नोकरदारांचा प्रतिसाद कमीच आहे.
बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच...
साहित्य २०१८ २०१९ २०२० २०२१
सिमेंट २९० ३०० ३२० ३८०
विटा ४१०० ४२०० ४५०० ८०००
वाळू २८००० ३०००० ३५००० ५००००
खडी २३०० २५०० २७०० ३५००
स्टील ४१०० ४३०० ४५०० ५७००
साहित्य विक्रेते म्हणतात...
गेल्या वर्षभरात बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. दिवाळी, दसरा, अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर अनेकजण नवीन बांधकाम सुरु करत असत. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मंदावला आहे. - सिद्धेश्वर बिराजदार
दरवर्षी बांधकाम साहित्याच्या विक्रीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळायचा. मात्र, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाल्याने नवीन बांधकामे अत्यल्प सुरू आहेत. त्यामुळे साहित्य विक्रेत्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. दोन वर्षांच्या तुलनेत बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. - फरहान सौदागर
घर घेणे कठीणच...
कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. जमा पैशांमधून घर घेण्याचे स्वप्न होते. परंतु, बांधकाम साहित्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे घर घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे महागाई कमी कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. महागाई कमी झाल्यास घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. - बालाराम शर्मा
नवीन घर घेण्याचेच ठरवले होते. त्यानुसार आर्थिक नियोजनही केले होते. मात्र, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. महागाईमुळे बजेट कोलमडले असून, नवीन घर घेण्याचे सध्यातरी स्थगित केले आहे. या महागाईच्या स्थितीत घर घेणे अवघड ठरत आहे. त्यामुळे नवीन घर घेण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. - अविनाश रामढवे