लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देऊन दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली असून, दाखल काढण्यासाठी विद्यार्थी शाळांमध्ये जात आहेत. मात्र, परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर काय शेरा देणार, याबाबत मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालकांत संभ्रमाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी ४० हजार १२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये २२ हजार ७२६ मुले, तर १७ हजार ३९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरवर्षी दाखल्यावर परीक्षेचा महिना आणि विद्यार्थ्यांचा आसनक्रमांक नमूद करण्यात येत. मात्र, यावर्षी दहावीची परीक्षाच झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे दाखल्यावर काय शेरा देणार असला प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा...६०३
दहावीतील विद्यार्थी - ४०२८१
उत्तीर्ण विद्यार्थी - ४०१२२
मुले - २२७२६
मुली - १७३९६
मुख्याध्यापक म्हणतात...
कोरोनामुळे दहावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. १६ जुलै रोजी निकाल जाहीर झाला असून, अद्याप गुणपत्रिका प्राप्त झालेल्या नाहीत. त्या प्राप्त झाल्यावरच दाखल्यांचे वितरण केले जाईल.
- जी. एल. जोगदंड
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांच्या निकालावर शेरा द्यावा का, याबाबत संभ्रम आहे. शिक्षण मंडळाकडून याबाबत पत्र मिळताच त्याप्रमाणे दाखल्यांचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाईल. निकालपत्र मिळाले नसल्याने दाखला दिलेला नाही.
- गोविंद शिंदे
शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा...
दहावीचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला आहे. अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्र मिळालेले नाही. दाखल्यावर काय शेरा द्यावा, याबाबत शिक्षण विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. निर्णय होताच शाळास्तरावर सूचना देण्यात येतील, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
पालक म्हणतात...
निकाल जाहीर होऊन आठवडा झाला आहे. विद्यार्थ्यांना अद्यापही निकालपत्र मिळालेले नाही. पुुढील प्रवेशासाठी निकालपत्र आणि दाखला महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
- नंदकुमार थडकर
अकरावी प्रवेशाला सीईटीनंतर सुरुवात होईल. दाखल्यावर काय शेरा देणार याबाबत निर्णय झाला नसल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे निर्णयाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश लवकर होण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे.
- प्रकाश आयरेकर