चाकुरात भरला आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:29+5:302021-03-27T04:20:29+5:30
चाकूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत ...

चाकुरात भरला आठवडी बाजार
चाकूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत शुक्रवारी शहरातील दुसऱ्या ठिकाणी आठवडी बाजार फुलला होता. त्यावर कारवाई करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे संपूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.
शहरात दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारसाठी पंचक्रोशीतील नागरिक येतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवावेत, असे आदेश दिले आहेत. मात्र, शुक्रवारी येथील बोथी चौक व राष्ट्रीय महामार्गालगत आठवडी बाजार भरला होता. बहुतांश शेतक-यांनी बाजारकडे येणे टाळले होते. परंतु, व्यापाऱ्यांची मोठी संख्या होती. जादा दराने भाजीपाल्याचे व्यवहार झाले. तसेच बाजारात विनामास्क नागरिकांची संख्या अधिक होती. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी दिसून आले नाहीत.
सकाळपासून भरलेला बाजार सायंकाळपर्यंत होता. येथील मुख्य रस्ता वगळता बोथी चौकासह अन्य ठिकाणी बाजार फुलला होता. स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले. एकीकडे जिल्हाधिकारी नियम अधिक कडक करीत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन उदासीन असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे विनामास्क फिरणा-यांची संख्या दिसून येत असून, फिजिकल डिस्टन्सही राखला जात नाही.
नियमांचे सर्वांनी पालन करावे...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. मास्कचा नियमित वापर करावा, हात सतत धुवावे, फिजिकल डिस्टन्स राखावा, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी नगरपंचायतीने करावी. त्यात कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वेळोवेळी काही निर्णय घेतले जात आहेत. पुढील आदेश येईपर्यंत आठवडी बाजार भरल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश नगरपंचायत व पोलिसांना देण्यात आले आहेत, असे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सांगितले.