जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:23+5:302021-03-15T04:18:23+5:30
लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले असून, दिनांक ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार ...

जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद
लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले असून, दिनांक ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद राहणार आहेत. त्याचबरोबर रात्री ११ ते पहाटे ५ असा संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना उपस्थित राहण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ‘नो मास्क-नो एन्ट्री’ या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जीम, व्यायामशाळा, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्वीमिंग पूल हे ५० टक्के क्षमतेने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वैयक्तिक सरावासाठी सुरू ठेवण्यास परवानगी राहील. याठिकाणी शारीरिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल. मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यास व प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास प्रतिबंध असेल. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनाला आल्यास संबंधित जीम, व्यायामशाळा, खेळाची मैदाने, स्वीमिंग पूल बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. सर्वप्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, यात्रा उत्सव, उपोषण, आंदोलने, निदर्शने, मोर्चा आदींना पुढील आदेशापर्यंत मनाई राहील. भाजी मंडईमध्ये कोविड - १९ प्रतिबंधात्मक व सुरक्षा नियम, शारीरिक अंतर, फेस मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता इत्यादी नियमांचे पालन होईल. या अनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.
पूर्वनियोजित लग्न, त्या अनुषंगिक समारंभ हे ५० व्यक्तिंच्या मर्यादेत कोविड प्रतिबंधात्मक व सुरक्षा नियमांचे पालन करून पार पाडण्यात यावेत. लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात व त्यालगत तीन किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी राहील. यामध्ये अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सूट असेल.
राज्य, केंद्र शासनाच्या पूर्वनियोजित पदभरतीच्या परीक्षा, एमपीएससी परीक्षा घेण्यास, परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाण्या-येण्यास कसल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड प्रतिबंध व सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश आहेत.