आठवडी बाजार भरला, पालिका प्रशासनाने उठविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST2021-03-23T04:20:49+5:302021-03-23T04:20:49+5:30
अहमदपूर शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच दिवशी ३४ कोराेना बाधित आढळले. परिणामी, लातूर जिल्ह्यात आठवडी बाजार ...

आठवडी बाजार भरला, पालिका प्रशासनाने उठविला
अहमदपूर शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच दिवशी ३४ कोराेना बाधित आढळले. परिणामी, लातूर जिल्ह्यात आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. असे असताना अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून काही शेतकरी, भाजीपाला उत्पादक विक्रीसाठी अहमदपुरात दाखल झाले हाेते. याबाबत गत आठवड्यात बाजार भरणार नाही, अशा सूचना संबंधित शेतकरी, व्यापारी आणि भाजीपाला उत्पादकांना देण्यात आल्या हाेत्या. मात्र, जिल्हा परिषद मैदानावर दुपारच्या वेळी शेतकरी जमा झाले. त्यांनी आपली दुकाने थाटली हाेती. एकाचे पाहून दुसऱ्याने भाजीपाला रस्त्यावरती मांडला आणि खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू झाला. टप्प्याटप्प्याने ग्राहकांची वर्दळ वाढली आणि पाहता-पाहता आठवडी बाजार गर्दीने फुलून गेला. सदर बाब लक्षात येताच, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी अतिक्रमण व नगरपरिषदेच्या इतर पथकांनी सूचना केली. संबंधितांना विनंती करण्यात आली. मात्र, ते दाद देत नसल्याचे पाहून भाजीपालाच जप्त करून ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आला. त्यानंतर मात्र बाजार काहीसा ओसरला. कोरोनासंदर्भात कुठलेही नियम पाळले पाळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मास्क नाही ना सॅनिटायझर नाही. परिणामी, अमदपूर शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नागरिकांचा बिनधास्त वावर...
अहमदपूर शहर आणि तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांची बेफिरी वाढली आहे. काेराेनाबाबत इकडे जिल्हा, तालुका आणि स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. प्रबाेधन केले जात आहे. आराेग्य विभागाकडून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करत वावरत असल्याचे दिसून येत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची, फिरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे समाेर आले आहे. पालिका, पाेलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे, तर काही ठिकाणी वाहनांची तपासणीही केली जात आहे.