लातूर : यंदा राज्यात १५ ते २० जून रोजी मान्सून हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या केवळ २ लाख ३२ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी ३७ टक्के इतकी आहे. ज्या शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर पेरणी केली, ती पिके आता कोमेजू लागली आहेत. दरम्यान, हवामान विभागाचा अंदाज चुकल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असल्याचे चित्र आहे.
जुनच्या पहिल्या आठवड्यात काही भागात पाऊस पडला. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, मुबलक पाऊस होईल, या आशेवर जिल्ह्याच्या काही भागात पेरणी सुरू केली आहे. परंतु, अद्याप दमदार पाऊस पडलेला नाही. हवामान खात्याचा पावसाचा अंदाजच चुकल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जिल्ह्यात ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी अपेक्षित आहे. आतापर्यंत २ लाख ३२ हजार ६१९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने ६३ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
फोटो कॅप्शन...
जिल्ह्यात प्रारंभीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस...
तालुका पेरणी पाऊस
लातूर १४.५१ १२५.२
औसा २५.८८ १२७.५
अहमदपूर ५५.१९ १९०.५
निलंगा १२.८८ ८८.२
शिरुर अ. १६.२६ ९५.६
उदगीर ६८.८६ २१६.६
चाकूर ६४.४५ १७०.४
रेणापूर ५३.७९ १६२.१
देवणी ११.०२ १५८.२
जळकोट १८.०८ २२६.५
पावसाची स्थिती...
अपेक्षित पाऊस ७९१ मि.मी.
आतापर्यंत झालेला पाऊस १४४ मि.मी.
कोठे किती पेरणी...
अपेक्षित क्षेत्र - ६,१२,४२१
प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - २,३२,६१९
सर्वाधिक पाऊस - जळकोट २२६ मि.मी.
सर्वात कमी पाऊस - निलंगा - ८८ मि.मी.
शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा...
लवकर पाऊस येणार असल्याचे सांगण्यात आल्याने मशागतीची कामे पूर्ण केली. प्रारंभीच्या पावसामुळे पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजून जात आहेत. पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागेल.
- अण्णासाहेब महामुनी, शेतकरी
जमिनीतील ओलाव्यामुळे पेरणी केली. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने पावसाची प्रतीक्षा आहे. लवकर पाऊस झाल्यास दिलासा मिळेल. नाही तर मोलाचे बियाणे वाया जाईल.
- उद्धव सूर्यवंशी, शेतकरी
हवामान विभागाने पावसाचा अंदाज सांगितला होता. मात्र, समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मशागतीची कामेही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
- उमाकांत भुजबळ, शेतकरी