दुभाजकातील झाडे जगविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:36+5:302021-04-02T04:19:36+5:30
शिरूर अनंतपाळ : रस्ता दुभाजकातील झाडे जगविण्यासाठी येथील एका सेवाभावी संस्थेने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा ...

दुभाजकातील झाडे जगविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा
शिरूर अनंतपाळ : रस्ता दुभाजकातील झाडे जगविण्यासाठी येथील एका सेवाभावी संस्थेने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेता
संस्थेच्या वतीने खर्चातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हातही दुभाजकातील झाडे बहरत आहेत.
शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी श्री अनंतपाळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
शहरातून गेलेल्या राज्यमार्गावरील दुभाजकात शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेता स्वखर्चातून जवळपास दीड किमी अंतरात विविध रंगीबेरंगी फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने दुभाजकातील झाडे कोमेजून जात आहेत. त्यामुळे झाडे जगविण्यासाठी संस्थेने पदरमोड करून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासाठी संस्थेला दर महिन्याला तीन हजारांचा खर्च करावा लागत आहे. पाण्यामुळे दुभाजकातील विविध फुलांची झाडे बहरली आहेत. शहरातून जा- ये करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नगरपंचायतीकडून दुर्लक्ष...
नगरपंचायतीने शासकीय योजनेतून रक्कम खर्चून दुभाजकात झाडे लावली होती. परंतु, सदरील झाडांच्या जोपासनेकडे दुर्लक्ष झाल्याने नगरपंचायतच्या वृक्ष लागवडीचा विषय चर्चेत राहिला. सेवाभावी संस्थेने केवळ सेवाभाव ठेवून टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. दरम्यान, कोवळी झाडे कोमेजून जाऊ नये, म्हणून संस्थेचे संचालक डी.एन. लखनगावे, उमाकांत देवंगरे, नरेंद्र शिवणे, बापुराव देवंगरे, किशनराव इंदलकर, शंकर बेंबळगे, वैजनाथ नाबदे, शिवराज शेरसांडे, बालाजी येरमलवार आदींनी बैठक घेऊन महिनाभरात पाच टँकर पाणीपुरवठा सुरू केला आहे.