अहमदपूरला १० दिवसांआड पाणीपुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:00+5:302021-05-03T04:15:00+5:30
सध्या कोरोनाचा संसर्ग आणि उन्हाचा पारा वाढत आहे. अशा परिस्थितीत अहमदपूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ...

अहमदपूरला १० दिवसांआड पाणीपुरवठा करावा
सध्या कोरोनाचा संसर्ग आणि उन्हाचा पारा वाढत आहे. अशा परिस्थितीत अहमदपूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेचे टँकर आले की नागरिकांची एकच धावपळ उडते. यासंदर्भात शुक्रवारी लोकमतमधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता बडे, पालिका कार्यालयीन अधिक्षक सतीश बिलापट्टे, पालिकेचे अभियंता गणेश पुरी, मुस्सा शेख, गुत्तेदार कुणाल सानप यांनी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा प्रशासन अधिका-यांनी अहमदपुरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा झोन निहाय आढावा घेतला. तसेच गुत्तेदारास येत्या दीड महिन्यात सर्व कामे पूर्ण करून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. नवीन जलवाहिनीवरुन वितरण सुरु होईपर्यंत, जुन्या जलवाहिनीवरुन किमान दहा दिवसाला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका अभियंत्यास सूचना केल्या. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सांगितले.
आगामी काळात पालिकेने शहराला शुध्द पाणीपुरवठा करावा. ज्या नवीन भागामध्ये वाढीव वितरण व्यवस्था करणे आवश्यक आहे, त्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिका व गुत्तेदाराने समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करावेत, अशाही सूचना करण्यात आल्या.