जळकोट : तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ढोरसांगवी जिरगा प्रकल्पातील पाणी पातळी अद्यापही जोत्याखालीच असून, केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील अन्य भागात पाऊस झाल्याने बहुतांश साठवण तलाव ८० टक्के भरले. मात्र, या भागामध्ये पाऊसच झाला नसल्याने पाणी साठ्यात वाढ झालेली नाही.
डोंगरकोनाळी येथील साठवण तलावात अद्याप पाणी पातळी वाढली नसल्याने रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. ढोरसांगवी जिरगा या साठवण तलावाच्या वरच्या भागात लहान पाझर तलाव आहेत. वरच्या भागातूनच पाण्याचा स्रोत येथे येतो. हे पाझर तलाव भरल्याशिवाय या मोठ्या प्रकल्पात पाणी येत नाही. त्यामुळे प्रसंगी प्रकल्पातील पाणीसाठा मृतसाठा असून, मोठा पाऊस न झाल्यामुळे हा तलाव कोरडाच राहतो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या तालुक्यातील सर्वात जुना व सर्वात मोठा असा ढोरसांगवीचा प्रकल्प असून, त्यापाठोपाठ डोंगरकोनाळीचाही मोठा साठवण तलाव आहे. धामणगाव, जिरगा, ढोरसांगवी, येलदरा, सोनवळा, धनगरवाडी, एवरी कोळनूर, लाळी खुर्द, लाळी बुद्रुक, करंजी, जगळपूर, हावरगा या भागात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे साठवण तलावातील जलसाठा तर वाढलाच नाही मात्र गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागातील मूग, उडीद सोयाबीनचे पीक पूर्णत: धोक्यात आले आहे. त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
पिकांचे नुकसान, मदतीची मागणी
प्रशासनाने तत्काळ सोयाबीन, मूग, उडीद व गेलेल्या पिकांचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सानुग्रह अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, जिल्हा परिषदेचे गटनेते जिल्हा परिषद सदस्य संतोष तिडके, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथअप्पा किडे, सभापती बालाजी दबडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, बालाजी आगलावे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष महेश धूळशेटे, शिवानंद देशमुख, खादर लाटवाले, धनंज ब्रह्मंना यांनी केली आहे.