अहमदपूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने अहमदपूर तालुक्यातील लांजी येथील शाळेने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली असून, शाळेतील वर्गासोबतच परिसरही रंगरंगोटी करीत आकर्षक बनविला आहे. शाळेच्या भिंती बोलक्या झाल्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमधून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
लांजी येथे इयत्ता आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. बाला उपक्रमांतर्गत शाळेच्या संरक्षक भिंतीवर रंगरंगोटी करण्यात आली असून, या माध्यमातून ग्रामस्वच्छता, प्रदूषणमुक्त गाव, पर्यावरणमुक्त गाव, जल पुनर्भरण असे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सादर केले आहेत. गणित कोपरा, विज्ञान कोपरा, आशा कोपरा, बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध संकल्पनांचे अत्यंत दिमाखदारपणे केलेले रेखाटन आकर्षण बनले आहे. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना उपयोगी असा अभ्यासक्रम भिंतीवर रेखाटून विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करण्याची संधी देत आहे. शिक्षक आणि ग्रामपंचायत, गावकऱ्यांनी या रंगरंगोटीसाठी लोकवाटा म्हणून सुमारे एक लाख ५१ हजार रुपयांची वर्गणी जमा करून शाळेचे वैभव वाढविण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. या उपक्रमांतर्गत शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यासाठी शिक्षक व ग्रामपंचायतीने पुढाकार घेत शाळेची प्रत्येक भिंत बोलकी केली आहे. त्या भिंतीकडे पाहून विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढाकाराने या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक घराच्या भिंती शैक्षणिक अभ्यासलेखन करून बोलक्या करण्यात आल्या आहेत. यशस्वितेसाठी सरपंच रुक्मिणताई कदम, उपसरपंच कालिदास कदम, रामानंद मुंडे, संतोष कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, गावकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न...
शाळेच्या भिंतीवर शैक्षणिक कलाकृती, सुविचार, अक्षर, अंक अशा विविध विषयांतील चित्र काढून खेळते शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. शाळेच्या परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करून ऑक्सिजन हब तयार करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
- रामानंद मुंडे, शालेय शिक्षण समिती सदस्य
शाळा पोहोचतेय विद्यार्थ्यांपर्यंत...
ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी या रंगरंगोटीसाठी लोकवाटा म्हणून सुमारे एक लाख ५१ हजार रुपयांची वर्गणी जमा करून कल्पनेला भरभक्कम साथ दिली. शाळेचे कामकाज पाहून गटशिक्षणधिकारी बबनराव ढोकाडे, शिक्षण विस्ताराधिकारी नानासाहेब बिडवे यांच्यासह सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती, सरपंच रुक्मिणताई कदम, उपसरपंच कालिदास कदम, रामानंद मुंडे, संतोष कदम व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.
- नंदकुमार कोनाले, मुख्याध्यापक