लातूर : एप्रिल आणि मे असे सलग दोन महिने लॉकडाऊनमुळे शहरासह जिल्ह्यातील बाजार बंद होता. परिणामी, भाजीपाल्यांची विक्री सकाळी ११ पर्यंत सुरू होती. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजी मंडईबरोबर आठवडी बाजारही सुरू झाले आहे. भाजीपाल्यांची आवक होत असली, तरी प्रतिकिलोच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. जवळपास २५ टक्क्यांनी भाजीपाला महागला आहे.
लातूर शहरातील भाजी मंडई, गंजगोलाई परिसर आणि रयतु बाजारात भाजीपाल्यांसह फळांची मोठी आवक होत आहे. शेवगा, वांगी, कारले, कोबीने शंभरी ओलांडली आहे तर बहुतांश भाजीपाल्यांचा प्रतिकिलोचा भाव ८० ते १०० रुपयांच्या घरात आहे. शेवगा, वांगी, कारले हे १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
पुन्हा वरणावर जोर
अनलॉकनंतर भाजीपाल्यांची आवक वाढली असली तरी भावही वधारले आहेत. दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. दारावर येणारा भाजीपालाही स्वस्त राहिला नाही. परिणामी, गृहिणींचे बजेट आता कोलमडले आहे.
- माधुरी हिंपळनेरकर, गृहिणी
लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि भाजी मंडईत भाजीपाला दाखल झाला. आता हा भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सध्या २५ ते ३० टक्क्यांनी भाववाढ झाल्याचे दिसून येते. काही भाजीपाल्यांचे भाव दुपटीवर गेले आहेत. - मोहिनी उदगीरकर, गृहिणी
म्हणून वाढले दर
खरिपाचा हंगाम असल्याने भाजीपाल्यांची लागवड घटली आहे. परिणामी, दर गगनाला भिडले आहेत. काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांची लागवड केली आहे. तोच भाजीपाला सध्या बाजारात दाखल होत आहे. मागणी अधिक अन् आवक कमी, अशी स्थिती झाल्याने भाववाढ झाली आहे. - लक्ष्मण वाढवणकर, शेतकरी
शेतकऱ्यांच्या पदरी अद्यापही निराशा
शेतात भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली. त्यासाठी ४० ते ५० हजार रुपयांचा खर्चही करण्यात आला. एकरात केवळ ६० हजारांचे उत्पन्न मिळाले. बाजारपेठ मिळाली असती तर हे उत्पन्न दीड लाखांच्या घरात गेले असते.
शेतात टोमॅटो आणि मिरचीची लागवड केली होती. मात्र, ऐनवेळी लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. त्यातून नुकसान झाले. आठवडी बाजार बंद असल्याने हा भाजीपाला विकता आला नाही. यातून केवळ ४० हजारांच्या घरात उत्पन्न मिळाले.